शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर ;तीन लिपिकांसह खासगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा

शेवगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर करून झोन दाखला तयार केल्याचा आणि तो अधिकृत असल्याचे भासवून नागरिकाकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी नगरपरिषदेतील तीन वसुली लिपिकांसह एका खासगी व्यक्तीविरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया दत्तात्रय घाडगे यांनी 25 ऑगस्ट रोजी शेवगाव पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार वसुली लिपिक तुराबअली शौकतअली सय्यद, हबीब सुन्ना शेख आणि ज्ञानेश्वर प्रल्हाद भारस्कर, तसेच समीर शहा यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.23 जुलै 2026 रोजी महेशर मन्सूर कुरेशी हे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी घाडगे यांच्याकडे आले होते. त्यांनी एक झोन दाखला सादर केला. मात्र, त्या दाखल्यावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घराच्या बांधकामासाठी कर्ज घेण्याच्या उद्देशाने त्यांनी समीर शहा यांच्या माध्यमातून फायनान्स कंपनीकडे कर्जप्रकरण केले होते. या कर्जासाठी झोन दाखला आवश्यक असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.

कुरेशी यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या गट क्रमांक 1628 आणि जुना सर्व्हे क्रमांक 218 मधील जागेसाठी नगरपरिषदेकडे झोन दाखल्यासाठी अर्ज केला होता. संबंधित जागा ग्रीन झोनमध्ये असल्याने बांधकामासाठी झोन दाखला देता येणार नसल्याचे नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी कुरेशी यांना सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.

यानंतर फायनान्सशी संबंधित असल्याचे सांगणाऱ्या समीर शहा यांनी नगरपरिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांच्या संगनमताने झोन दाखला काढून देण्याचे आश्वासन दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यासाठी कुरेशी यांच्याकडून 9 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. नगरपरिषदेचा शिक्का आणि मुख्याधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी वापरून झोन दाखला तयार करण्यात आला. हा दाखला अधिकृत असल्याचे भासवून कुरेशी यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकरणात तुराबअली सय्यद, हबीब शेख आणि ज्ञानेश्वर भारस्कर या तीन वसुली लिपिकांनी संगनमताने पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नगरपरिषदेच्या शिक्क्याचा गैरवापर करून मुख्याधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी बनावट कागदपत्र तयार करणे, शासकीय कार्यालयाचा शिक्का आणि अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचा गैरवापर तसेच आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles