पारनेर-नगर तालुक्यात दहशत निर्माण करणारी टोळी वर्षभरासाठी हद्दपार
अहिल्यानगर – पारनेर आणि नगर तालुक्यात दहशत निर्माण करून शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या एका गुन्हेगार टोळीला एका वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई केली आहे. सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी या टोळीविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता.
हद्दपार केलेली टोळी –
१) टोळी प्रमुख अतुल विश्वनाथ शिंदे (रा. शहाजापूर, ता. पारनेर)
२) अरुण शिवाजी गवळी (रा. सदर)
३) अनिकेत शशिकांत गवळी (रा. सदर)
या टोळीविरुद्ध नगर तालुका आणि सुपा पोलीस ठाण्यात चोरी, मारहाण, जीवेठार मारण्याची धमकी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
प्रस्तावाची सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना एका वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत.
यापुढेही जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी, शरीराविरुद्ध, मालमत्तेविरुद्ध, गोवंश, शस्त्र व वाळू चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.


