विशिष्ट समाजाने नाकारले तेव्हा कोणी विचारले नाही; फलकाशी संबंध नाही – सुजय विखे पाटील
अहिल्यानगर – लोकसभा निवडणुकीत एका विशिष्ट समाजाने नाकारले तेव्हा कोणी विचारायला आले नाही, असे सांगत आता कोणी समर्थन देत असेल तर त्यांनीच विचारावे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
अहिल्यानगर शहरात मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मुस्लीम समाजाच्या वतीने मिरवणूक मार्गावर लावण्यात आलेल्या फलकावर डॉ. सुजय विखे पाटील यांचा फोटो असल्याने चर्चा सुरू झाली होती. याबाबत गुरुवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका स्पष्ट केली.
विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीतील सर्व घटक पक्ष जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लागत आहेत. आपण जात-धर्म विरहित राजकारण करतो. अशा पद्धतीने विभाजन करणे चुकीचे आहे.
लोकसभेला एका विशिष्ट समाजाने नाकारले तेव्हा त्यांना विचारायला कोणी गेले नाही आणि आपल्यालाही कोणी विचारायला आले नाही. आता कोणी समर्थन देत असेल तर त्यांना फलक लावावा वाटला असेल, त्यांनाच विचारले पाहिजे. या प्रक्रियेशी आपला काहीही संबंध नाही.
अहिल्यानगरच्या विकासावर भर असल्याचे सांगत त्यांनी विषयाचा वाद करून विभाजन करू नये, असे आवाहन केले. नाकारले तेव्हाही दुःख झाले नाही आणि आता कोणी स्वीकारत असेल तर त्याचा आनंद नाही, असेही ते म्हणाले.


