अहिल्यानगर: वकिलाची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या आरोपावरून जिल्हा न्यायालयाने नेवाशातील लष्करे टोळीतील ७ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा आज, शुक्रवारी सुनावली. या खटल्यातील इतर ५ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी ही माहिती दिली. नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारातच भरदुपारी हत्येची घटना घडली होती.
प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण व सादिक बशीर शेख या ७ जणांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर कटाचा थेट व पुरेसा पुरावा न मिळाल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे व सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या ५ जणांची खटल्यातून मुक्तता करण्यात आली.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांनी काम पाहिले. त्यांना वकील परिमल फळे व पैरवी अधिकारी तथा पोलीस हवालदार महेश जोशी यांनी सहाय्य केले.वकिलाच्या हत्येची घटना राज्यभर गाजली होती. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, नेवासा येथील वकील रियाज पठाण यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात अण्णा लष्करे खून प्रकरणात साक्ष दिली होती. या खटल्यात त्यांना सरकारी पक्षाने फितूर घोषित केले होते. या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रात छापून आल्यानंतर अण्णा लष्करे टोळीतील आरोपींनी वकील रियाज पठान हे फिर्यादीच्या बाजूने बोलले याचा राग धरून कट रचला. त्यावेळी पुण्यातील तुरुंगात असलेल्या सोपान गाढे व त्याच्या साथीदारांनी हा कट रचल्याचा पोलिसांचा दावा होता.
दि. १६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी पावणेतीन-तीनच्या सुमारास वकील रियाज पठाण हे नेवासा येथील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व नोंदणी उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात एका लिंबाच्या झाडाखाली दस्त नोंदणीसाठी बसले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. आरोपी प्रवीण खरचंद याने पाठीमागून येऊन पिस्तुलातून वकील पठाण यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांनी पठाण यांचे दोन्ही बाजूने हात घट्ट धरून ठेवले व इतर तिन आरोपींनी गोळ्या झाडण्यासाठी चिथावणी देत होते. या घटनेनंतर पठाण खाली कोसळले व आरोपींनी पळ काढला. मात्र नेवासा पोलिसांनी घटनास्थळीच प्रवीण खरचंद याला पिस्तुलासह पकडले.
घटनेनंतर प्रत्यक्षदर्शी अशी पठाण व असिफ शेख यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पठाण यांना प्रथम नेवासा ग्रामीण रुग्णालयात, नंतर नगरमधील खाजगी रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. असिफ पठाण यांच्या फिर्यादीनुसार नेवासे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खटल्यात एकूण २९ साक्षीदार सरकार पक्षातर्फे तर बचाव पक्षाच्या वतीने ३ साक्षीदार तपासण्यात आले.


