रायगड जिल्ह्यातील केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी धडक कारवाई केली आहे. एका दगडखाणी व्यवसायाशी संबंधित जीएसटी आणि रॉयल्टी प्रकरण निकाली काढण्यासाठी तब्बल 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सीबीआयने अतिरिक्त आयुक्तांसह अधीक्षक आणि एका खासगी मध्यस्थाला अटक केली आहे.सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, एका दगड उत्खनन कंपनीचे जीएसटी आणि रॉयल्टीशी संबंधित वाद मिटवून प्रकरण बंद करायचे होते. यासाठी सीजीएसटीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला 1 कोटी 50 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती ही रक्कम 40 लाख रुपयांवर निश्चित करण्यात आली.
सरकारी अधिकाऱ्यांनी स्वतः रक्कम न स्वीकारता नरेंद्र राजपूत या खासगी मध्यस्थाकडे पैसे देण्यास सांगितले. सीबीआयने 27 ऑगस्ट रोजी सापळा रचून 40 लाख रुपयांची लाच स्वीकारताना मध्यस्थाला रंगेहाथ पकडले मध्यस्थाच्या अटकेनंतर केलेल्या तपासात अधीक्षक आणि अतिरिक्त आयुक्तांचा थेट सहभाग निष्पन्न झाला. दोघांनीही लाचेची रक्कम स्वीकारल्याचे मान्य केल्यानंतर सीबीआयने त्यांना अटक केली.
1. विनय कुमार कांठेती (अतिरिक्त आयुक्त, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ)
2. राकेश कुमार सिन्हा (अधीक्षक, CGST, रायगड)
3. नरेंद्र राजपूत (लाच स्वीकारणारा खासगी मध्यस्थ
अटकेच्या कारवाईनंतर सीबीआयने आरोपींच्या निवासस्थानांवर आणि संबंधित ठिकाणांवर छापे मारून झडती घेतली. या झाडाझडती दरम्यान सीबीआयला 43 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 90 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले असून ते जप्त करण्यात आले आहेत. सीबीआय या प्रकरणी अधिक तपास करत आहे.


