अहिल्यानगर-राहुरी तालुक्यासह नगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरणार्या राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वेमार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाच्या वतीने भूसंपादनाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या अधिसूचनेमुळे प्रस्तावित 21.84 किलोमीटरच्या राहुरी-शनिशिंगणापूर नवीन रेल्वेमार्गाच्या कामाला प्रशासकीय चालना मिळाली आहे.
भारत सरकारच्या अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेनुसार, रेल्वेमार्गासाठी आवश्यक जमीन संपादनाचा शासनाचा मानस स्पष्ट केला असून राहुरी तालुक्यातील देसवंडी तसेच नेवासा तालुक्यातील वंजारवाडी येथील संबंधित जमिनींचा त्यामध्ये समावेश केला आहे. राजपत्रात संबंधित गट क्रमांक, जमीनधारकांचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ आणि संपादित क्षेत्राचा सविस्तर तपशील दिला आहे. भूसंपादन प्रस्तावित राजपत्रातील अनुसूचीनुसार देसवंडी गावातील विविध गट क्रमांकांच्या शेतजमिनी रेल्वे प्रकल्पासाठी संपादनाच्या प्रक्रियेत आहेत.


