बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून तरुणाची फसवणूक; एक लाख २७ हजारांची ऑनलाइन लूट
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून ते पुन्हा सुरू करण्याची अथवा कायमस्वरूपी बंद करण्याची प्रक्रिया करण्याच्या बहाण्याने बँकेच्या कर्मचाऱ्याचे बनावट रूप धारण केलेल्या भामट्यांनी एका तरुणाची एक लाख २७ हजार ४९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत कल्याण रोड परिसरात राहणाऱ्या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या मोबाईल क्रमांकावर १ जून रोजी सायंकाळी तीन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन आले. यातील एका व्यक्तीने आपण ॲक्सिस बँकेच्या सपोर्ट टीममधून बोलत असल्याचे सांगितले. त्याने व्हॉट्सॲपवर ॲक्सिस बँकेचे असल्याचे भासणारे ओळखपत्रही पाठविल्याने फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला.
फिर्यादीने क्रेडिट कार्ड कायमस्वरूपी बंद करायचे असल्याचे सांगितल्यानंतर संबंधित व्यक्तीने त्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया करण्यास सांगितले. त्याने नेट बँकिंग अथवा मोबाईल बँकिंगमध्ये लॉगिन करण्यास सांगून विविध माहिती भरण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या खात्यातील शिल्लक रक्कमेबाबतही त्याने विचारणा केली.
त्यानंतर फिर्यादीच्या खात्यातील रक्कम कमी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. फिर्यादीने याबाबत संबंधित व्यक्तीला विचारणा केली असता, तुमची रक्कम परत रिफंड होईल, त्यासाठी पुढील प्रक्रिया करावी लागेल, असे सांगण्यात आले.
या फसवणुकीनंतर तरुणाने कोतवाली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


