Sunday, February 22, 2026

नावं बदलून १२ वेळा UPSC दिली? पूजा खेडकरने सांगितला शाळेपासूनचा घटनाक्रम

वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर गेल्या काही महिन्यांपासून अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वात मोठा आरोप म्हणजे तिने तब्बल १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिल्यानंतर तिला यश मिळालं. यापैकी नऊ वेळा तिने ‘पूजा दिलीपराव खेडकर’, तीन वेळा ‘पूजा मनोरमा दिलीप खेडकर’ असं नाव वापरल्याचा, तसेच वडिलांचं कधी ‘दिलीप’ तर कधी ‘दिलीपराव’ असं वेगवेगळं नाव वापरल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर तिने ओबीसी जातप्रमाणपत्राचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. यावर तिने पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

पूजा खेडकर म्हणाली, “मी पहिल्यापासून पूजा खेडकर हेच नाव वापरलं आहे. हेच माझं लहानपणापासूनचं नाव आहे. यूपीएससी परीक्षा पहिल्यांदा दिली तेव्हा देखील मी हेच नाव वापरलं होतं आणि शेवटच्या दिवशी देखील हेच न वापरलं. दरम्यानच्या काळात मी फक्त एकच गोष्ट केली की मी माझ्या नावात माझ्या आईचं नाव समाविष्ट केलं. म्हणजे मी पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव करून घेतलं. २०१४ मध्ये मी गॅझेट नोटिफिकेशनद्वारे कायदेशीररित्या हे नाव बदलून घेतलं. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देखील त्यांच्या नावात आईचे नाव लावतात मी कायदेशीररित्या ते नाव लावले आहे”. लगावबत्ती या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत पूजाने सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.
“२०१४ मध्ये माझ्या संपूर्ण नावात कायदेशीररित्या आईचं नाव समाविष्ट केलं”

माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणाली, “मी जेव्हा माझ्या आईचं नाव माझ्या नावात समाविष्ट केलं तेव्हा सुरुवातीला मला यूपीएससीने त्याची परवानगी दिली नव्हती. मी सर्वांच्या माहितीसाठी सांगते, यूपीएससीच्या अर्जात आपल्या शालेय कागदपत्रांमध्ये जे नाव दिलेलं असतं तेच वापरावं लागतं. माझ्या शाळेच्या कागदपत्रांवर पूजा दिलीपराव खेडकर असं नाव लिहिलं होतं. मी लहान असताना शाळेतल्या कुठल्यातरी व्यक्तीने शाळेच्या कागदपत्रांवर माझं नाव असं लिहिलं होतं. त्यामुळे तेच नाव पुढेही कायम राहीलं. मात्र २०१४ मध्ये मी कायदेशीररित्या माझं नाव बदलून घेतलं.

पूजा खेडकर म्हणाली, “२०१७ मध्ये यूपीएससीने मला कायदेशीररित्या बदललेलं नाव वापरण्याची परवानगी दिली. २०२१ नंतर मी माझ्या अर्जात आईचं नाव वापरलं. मी पुन्हा एकदा नमूद करते की मी माझं नाव कधीच बदललं नाही. मी केवळ प्रतिज्ञापत्र सादर करून माझ्या आईचं नाव समाविष्ट करण्याची परवानगी मागितली होती. परवानगी मिळाल्यानंतर मी तीन वेळा परीक्षा दिली आणि प्रत्येक वेळी आईच्या नावासह माझं बदललेलं नाव वापरलं. तत्पूर्वी प्रत्येक वेळी मी प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles