घराच्या परसबागेत केली गांजाची लागवड
केडगावमध्ये पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई, १ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त
नगर – केडगाव परिसरातील तिरंगा चौक, वैष्णवनगर भागात स्वतःच्या घराच्या शेजारील कंपाउंडमध्ये बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करणाऱ्या एका आरोपीवर कोतवाली पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकला आहे. विकास बाळू उमाप (वय ३५, रा. तिरंगा चौक, वैष्णवनगर, केडगाव) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विकास उमाप हा त्याच्या राहत्या घराच्या बाजूला असलेल्या कंपाउंडमध्ये कोणतीही परवाना नसताना गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची चोरटी निर्मिती व विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सह आणि पंच व फॉरेन्सिक टीमसह नमूद ठिकाणी छापा टाकला.
घटनास्थळी पाहणी केली असता, पत्र्याच्या शेडच्या घराच्या बाजूला गांजासदृश हिरवेगार पानांनी बहरलेली झाडे दिसून आली. मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी ती गांजाचीच झाडे असल्याचे निश्चित केल्यानंतर पंचांसमक्ष कुन्हाडीच्या सहाय्याने ती झाडे मुळासकट उपटून काढण्यात आली. वजनमापन विभागाच्या अधिकारी व प्रमाणित वजन काट्याच्या उपस्थितीत केलेल्या मोजमापात एकूण १ लाख ८२ हजार ५०० रुपये किमतीचे १८.२५० किलोग्राम वजनाचे ओल्या गांजाची झाडे नमुने जप्त करण्यात आले.
या प्रकरणी आरोपी विकास बाळू उमाप याच्याविरुद्ध गुंकारक औषधद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(ब), २०(अ) नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे करीत आहेत.
सदर कारवाई पो.नि. नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कुणाल सपकाळे, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, सुरज कदम, सचिन लोळगे, अतुल लाटे, गंगाधर आंग्रे, संकेत धिवर, सोमनाथ राऊत, पल्लवी रोहोकले यांच्या पथकाने केली आहे.


