तरुणांना नशेची औषधे विकरणारे तिघे जेरबंद
अहिल्यानगर पोलिसांची गांधी मैदानात कारवाई
अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसरात जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना नशा आणि ताकद वाढवण्यासाठी बेकायदेशीर औषधे विकणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.महिला पोलीस हवालदार रोहिणी अशोक दरंदले यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख व पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, मार्कंडेय शाळेसमोर काही तरुण डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेची औषधे विकण्यासाठी थांबले आहेत. पोलिसांनी तातडीने दोन पंचांना सोबत घेऊन औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्या उपस्थितीत सदर ठिकाणी दुपारी छापा टाकला.
या कारवाईत प्रताप अशोक अकोलकर (वय 21, रा. करंजी, ता. पाथर्डी), तेजस गंगाधर वारुळे (वय 21, रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर) आणि तेजस अमित उळागड्डे (वय 22, रा. गजानन कॉलनी, अहिल्यानगर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्या काळ्या पिशवीत कमी रक्तदाबावर वापरल्या जाणाऱ्या मेफेंटरमाइन सल्फेटच्या 40 बाटल्या आणि एक मोटारसायकल असा एकूण 35 हजार रुपयांचा माल सापडला.चौकशी दरम्यान आरोपींनी कोणतीही परवानगी नसताना ही औषधे ऑनलाईन मागवून नशा करण्यासाठी विक्री करत असल्याची कबुली दिली. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेतल्यास भ्रम होणे, चक्कर येणे आणि जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. अन्न व औषध प्रशासनाने यातील नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून, तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


