दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी बोलताना शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंध असल्याचे आरोप फेटाळून लावले. “या आरोपांना का उत्तर द्यावे?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “भाजपाने गेल्या सहा वर्षांपासून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला”, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी गुरुवारी
माध्यमांशी बोलताना केला.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी निगडीत प्रश्नावर पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “याच्याशी माझा काहीही संबंध नाही आणि मी याचा विचारही केलेला नाही. मग मी यावर उत्तर का द्यावे? भाजपा प्रत्येकाची बदनामी करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी राहुल गांधींना अनेक वर्षांपासून पप्पू ठरवण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे”, असे आदित्य ठाकरे म्हणाले. माध्यमांशी बोलताना केला.
“भाजपाला जो कोणी त्यांच्या विरोधात बोलतो किंवा त्यांना खटकतो, त्याच्याशी त्यांना प्रॉब्लेम असते. मी म्हटल्याप्रमाणे, एखाद्या गोष्टीशी तुमचा काहीही संबंध नसेल तर त्यावर का बोलायचे किंवा त्याला महत्त्व का द्यायचे? हीच माझी भूमिका आहे”, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले. दरम्यान, “दिशा सालियन मृत्यू प्रकरणाशी ज्यांची नावे जोडली जात आहेत, त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नसेल तर त्यांनी पुढे येऊन आपली भूमिका स्पष्ट करावी”, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.
सुरुवातीपासूनच दिशा सालियन यांचा मृत्यू आत्महत्या म्हणून पाहता कामा नये, अशी भूमिका घेतल्याचे राणे यांनी सांगितले. सीबीआयच्या चौकशीत या प्रकरणातील सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआयला चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही सीबीआयला देण्यात आले आहेत. “तपासात गुन्हा दाखल करण्यासारखे काही आढळून आले नाही, तर सीबीआयने संबंधित न्यायालयात योग्य तो अहवाल दाखल करावा”, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.


