एमआयडीसी परिसरात घरातच सुरु होता कुंटणखाना; स्थानिक गुन्हे शाखेचा छापा, ३ महिलांची केली सुटका
नगर – एमआयडीसी परिसरात असलेल्या गजानन कॉलनी येथील एका घरात सुरु असलेल्या कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत ३ महिलांची सुटका केली असून कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेला अटक केली आहे. या महिलेवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करून अवैध व्यवसायांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते.
२ सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, गजानन कॉलनी येथील एका घरात महिलांकरवी कुंटणखाना (वेश्याव्यवसाय) चालवला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने पंचासमक्ष खात्री करण्यासाठी एका पोलीस अंमलदाराला बनावट ग्राहक म्हणून त्या ठिकाणी पाठवले. वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथकाने पंचासमक्ष छापा टाकून रजनी प्रभाकर डहाळे (वय ५६, रा. गजानन कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) या महिलेला ताब्यात घेतले.
ताब्यातील महिलेच्या घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी ३ महिला मिळून आल्या. चौकशी केली असता, आरोपी रजनी डहाळे हिने त्यांना वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे आणि ग्राहकांकडून स्वतः पैसे घेऊन त्यातील काही भाग त्यांना देऊन त्यांच्याकडून बळजबरीने वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्या तीन पीडित महिलांची सुटका केली. आरोपी महिला रजनी प्रभाकर डहाळे ही महिलांकडून कुंटणखाना चालवून आपली उपजीविका करत असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी तिचेविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा, १९५६ च्या कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक कल्पना पवार व पो.नि. संतोष मुटकुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक संदिप दरवडे व पोलीस अंमलदार विकास साळवे, विष्णू भागवत, शाहीद शेख, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, विजय ठोंबरे व महिला पोलीस अंमलदार चिमा काळे यांच्या पथकाने केली
———-
.——————————————————————————————————————————————————
महिलेवर जीवघेणा हल्ला
अहिल्यानगर ः वडिलांनी बक्षीसपत्र करून दिलेली शेतजमीन नावावर केल्याच्या रागातून एका महिलेवर कड्याने व लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव गुप्ता येथील अनिता सूर्यभान भांड (वय 41) या मजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या वडिलांनी त्यांना शेतजमीन बक्षीसपत्र करून दिली होती. याच गोष्टीचा प्रचंड राग आरोपींच्या मनात होता. 26 ऑगस्ट रोजी अनिता भांड यांना रस्त्यांत अडवले. त्यानंतर आरोपी अनिकेत बाबासाहेब दातीर, बाबासाहेब राधोजी दातीर (दोघे रा. एकरुख, शिर्डी) यांनी अनिता यांना बेदम लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोघांनी मिळून शिवीगाळ करत जीवे मारण्याची उघड धमकी दिली.


