अहिल्यानगर- बीड-परळी वैजनाथ या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पातील राज्य शासनाच्या 50 टक्के आर्थिक सहभागांतर्गत 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 50.40 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
यासंदर्भातील शासन निर्णयपरिवहन विभागाद्वारे जारी करण्यात आला आहे. अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या भागातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी 261.25 कि.मी. लांबीचा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या खर्चात सुधारणा होऊन दुसर्या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार एकूण अंदाजित खर्च 4 हजार 805.17 कोटी रुपये झाला आहे. यामध्ये राज्य शासनाचा 50 टक्के आर्थिक सहभाग म्हणजेच 2 हजार 402.59 कोटी रुपये निश्चित करण्यात आला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात राज्य शासनाने 250 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता.
आतापर्यंत राज्य शासनाकडून एकूण 2 हजार 341.23 कोटी रुपये या प्रकल्पासाठी वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे शिल्लक दायित्व 61.36 कोटी रुपये इतके उरले होते. मध्य रेल्वेने प्रत्यक्ष खर्चाच्या आधारे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्यानंतर, राज्य शासनाने 50.40 कोटी रुपये मध्य रेल्वेच्या मुख्य लेखाधिकार्यांकडे वर्ग करण्यास मंजुरी दिली आहे.


