लाच मागितल्याची खोटी तक्रार करणाऱ्यास तीन वर्षांचा कारावास
कोपरगाव – घरकुलाचा हप्ता मिळावा म्हणून ग्रामसेवकाने लाच मागितल्याची तक्रार करणाऱ्या तक्रारदाराला तीन वर्ष कारावासाची शिक्षा कोपरगाव न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी संजय खैरमर यांनी सुनावली. या उलट तपासादरम्यान तक्रारदाराने खोटी तक्रार केल्याचे साक्ष-पुराव्यावरून सिद्ध झाल्याने, फिर्यादीच आरोपी ठरला आहे.
या खटल्याची हकीगत अशी की, राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील शंकर रावसाहेब वैद्य यांच्या वडिलांच्या नावावर २०१५ मध्ये घरकुल मंजूर झाले होते. घरकुलाचे दोन हप्ते त्यांना मिळाले होते. तिसरा हप्ता देण्यासाठी तेथील ग्रामसेवक शंकर भालेराव यांनी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, अशी तक्रार शंकर वैद्य यांनी अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे केली होती.
तक्रारीनंतर लाचलुचपत विभागाच्या तत्कालीन उपअधीक्षकांनी सापळा रचून ग्रामसेवक भालेराव यास अटक केली होती. त्यांच्या विरुद्ध कोपरगाव न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी कोपरगाव येथील न्यायालयात जिल्हा व सत्र न्यायाधीश रघुवीर यांच्यासमोर झाली. सुनावणी दरम्यान उलट तपासात फिर्यादी शंकर वैद्य याने ग्रामसेवक भालेराव यांनी घरकुलाचा तिसरा हप्ता मिळण्याचा प्रस्ताव वडिलांच्या हातात दिल्याचे मान्य केले होते. प्रस्तावावरील त्याच्या वडिलांची सही, मजूर त्याने मान्य केली होती. तसेच त्याने पंचायत समितीला पत्र देऊन आम्ही वेळेत प्रस्ताव सादर न केल्यामुळे आम्हाला घरकुलाचा हप्ता वगैरे मिळाला नाही, असे कळवून काही रुपये उसणे घेतले होते, ते माझ्याकडे मागत होते असे देखील त्याने उलट तपासात कबूल केले होते.
त्यामुळे ज्यावेळी लाचलुचपत अधिकाऱ्याने सापळा रचला तेव्हा लाच मागण्याचे कारणच अस्तित्वात नव्हते असे निष्पन्न झाले होते.


