अहिल्यानगर-सिएट टायर कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट दुकानात मॅनेजर म्हणून काम करताना कंपनीच्या मालकाचा विश्वासघात करून खोट्या क्रेडिट नोटा, बनावट बिले व स्टॉक स्टेटमेंटमध्ये फेरफार केल्याप्रकरणी मॅनेजरविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात कंपनीची तब्बल 23 लाख 22 हजार 293 रूपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी अजय लक्ष्मीनारायण उपाध्याय (वय 31, रा. रोहन निथला, विमाननगर, पुणे) यांनी सोमवारी (14 सप्टेंबर) फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष रसिकलाल गुंदेचा (रा. आनंदधामजवळ, मार्केट यार्ड, अहिल्यानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2025 ते 17 जुलै 2026 या कालावधीत संशयित आरोपी हा एमआयडीसी परिसरातील मुरली मनोहर ट्रेडींग कंपनीच्या सिएट कॉन्ट्रॅक्ट नावाच्या दुकानात मॅनेजर म्हणून कार्यरत होता. या कालावधीत त्याने कंपनीच्या मालकाचा विश्वासघात करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेळोवेळी गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.
ग्राहकांकडून प्रत्यक्षात कोणतेही दोषमुक्त टायर परत आलेले नसतानाही आरोपीने नियमबाह्य पध्दतीने क्रेडिट नोटा जारी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच खोटे बिल तयार करून ते दाखल करण्यात आले. याशिवाय कंपनीच्या स्टॉक स्टेटमेंटमध्येही अफरातफर करण्यात आली. दुकानातील सॉफ्टवेअरमध्ये खोट्या नोंदी करून व्यवहारांमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. कंपनीच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी आरोपीने आत्महत्या करून घेण्याची तसेच खोटी केस करण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अर्ज चौकशीअंती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक अजय कौटे तपास करीत आहेत.


