पाथर्डी तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या शेतातही चोरी; शेतकरी त्रस्त

पाथर्डी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतमालाबरोबरच शेतीसाठी आवश्यक असलेल्या विद्युत उपकरणांच्या चोरीचे प्रकार वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. माजी आमदार अप्पासाहेब राजळे यांच्या शेतातील विहिरीवरील मोटारीची केबल चोरीला गेल्याच्या घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अप्पासाहेब राजळे यांच्या शेतातील विहिरीवर गेल्या अनेक वर्षांपासून सालगडी म्हणून काम करणाऱ्या मजुराला 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी मोटारीची केबल व्यवस्थित असल्याचे आढळले. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता इतर शेतकऱ्यांच्या विहिरीवरील केबलही चोरीला गेल्याचे समोर आले.
कासार पिंपळगाव परिसरातील एका शेतातील विहिरीवर सुमारे 100 फूट, ताराचंद बाबुराव राजळे यांच्या विहिरीवर 40 फूट, तर मच्छिंद्रनाथ राजळे यांच्या विहिरीवर 80 फूट केबल चोरट्यांनी लांबविल्याची माहिती आहे. चोरी झालेल्या केबलची एकूण किंमत सुमारे 13 हजार 200 रुपये असल्याचे सांगण्यात आले.

चोरट्यांकडून केवळ केबल चोरी होत असून त्यासाठी विहिरीजवळील विद्युत साहित्याचे नुकसानही केले जात असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक फटका वाढत आहे. शेतीच्या हंगामात मोटारी बंद पडल्याने पिकांना पाणी देण्याची मोठी अडचण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी चोरीच्या घटनांचा सखोल तपास करून टोळीचा छडा लावावा, तसेच रात्रीच्या वेळी शेतशिवारात पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींच्या शेतातही चोरी होत असेल तर दुर्गम भागातील सामान्य शेतकऱ्यांच्या सुरक्षेचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles