पेट्रोल पंप डीलरशिपचे आमिष दाखवून ८४ लाखांची फसवणूक; दोघे उत्तर प्रदेशातून जेरबंद
सायबर तपास पथकाची दमदार कारवाई; मुख्य सूत्रधाराला बेड्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – जिओ कंपनीची पेट्रोल पंप डीलरशिप व परवाना मिळवून देतो, असे आमिष दाखवून तब्बल ८४ लाख ५३ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन सायबर ठगांना सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
दि. ३१ ऑक्टोबर २०२५ ते ८ जुलै २०२६ या कालावधीत मोबाईल क्र. ८३८२०१११८६ धारक सौरभ अग्रवाल (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) याने तक्रारदाराला जिओ पेट्रोल पंपाची डीलरशिप मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर वेगवेगळी प्रोसेसिंग फी व इतर कारणे सांगून तक्रारदाराकडून ८४,५३,००० रुपये उकळून फसवणूक केली. या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात मोबाईल धारक सौरभ अग्रवाल, शिंदे इंजिनिअर व संबंधित बँक खातेधारक यांच्याविरुद्ध गु.र.नं. २५/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३१८(४), ३१९(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास करताना तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सागर ढिकले यांच्या पथकातील सपोउपनि सुदाम काकडे, पोहेकॉ उमेश खेडकर, रावसाहेब दुसले आणि पोहेकॉ शैलेश गोमसाळे यांनी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात जाऊन बनावट नावाने खोली भाड्याने घेऊन राहणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला. त्यांनी कौशल्याने सापळा रचून दोन सायबर ठगांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेले आरोपी –
१) आकाश सिंह पुत्र पुरण सिंह (वय ३३, रा. इमेलिया, ठाणा मुस्करा, तहसील मौदहा, जि. हमीरपूर, उत्तर प्रदेश) (टोपणनाव – सौरभ अग्रवाल)
२) निलेश कुमार द्विवेदी पुत्र सुरेश द्विवेदी (वय २९, रा. न्युरिया, ठाणा बिवार, तहसील मौदहा, जि. हमीरपूर, उत्तर प्रदेश)
हे दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी पंजाब व गुजरात राज्यात त्यांच्याविरुद्ध अशाच स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना आज रोजी न्यायालयात पोलीस कोठडी (रिमांड) कामी हजर करण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर एस. ढिकले, सपोउपनि सुदाम काकडे, पोहेकॉ उमेश खेडकर, रावसाहेब हुसळे, शैलेश गोमसाळे, रविंद्र कर्डिले, प्रशांत जाधव, आप्पा हिंगे आणि प्रशांत राठोड यांनी केली आहे.


