Friday, February 20, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात कपाशी बियाणांचा काळाबाजार…. विक्रेत्यावर गुन्हा दाखल

अहिल्यानगर -कपाशी बियाणे विक्रीत गैरप्रकार उघड झाल्याने कृषी विभागाने त्रिमूर्ती अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, पाचेगाव या दुकानावर धाड टाकत अनियमित विक्रीचे पुरावे गोळा केले. शेतकर्‍यांकडून मिळालेल्या तक्रारीच्या आधारे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे व नेवासा पंचायत समिती कृषी अधिकारी प्रताप कोपनर यांनी याठिकाणी भेट देऊन तपासणी केली. तपासादरम्यान महिको कंपनीचे एमआरसी 7391 (बाउन्सर) वाण अधिक दराने विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. शेतकर्‍यांनी विक्रीसंबंधीचा बिल आणि ऑनलाईन व्यवहाराचा पुरावा सादर केला ज्यामुळे बियाणे दुकानदाराने निर्धारित किमतीपेक्षा अधिक दर आकारल्याचे उघड झाले.

तपासणी दरम्यान खरेदी चलनावर कोणत्याही प्रकारचा बियाणे लॉट क्रमांक आढळला नाही तसेच दुकानात साठा व भावफलक अद्ययावत नसल्याचे दिसून आले. कृषी विभागाने बियाणे नियंत्रण आदेश 1983 व अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या विविध कलमांखाली कारवाई करत एकूण 51 कपाशी बियाणे पाकीटांवर विक्री बंद आदेश जारी केला तसेच कपाशी बियाण्याचा काळाबाजार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे व नेवासा पंचायत समिती कृषी अधिकारी प्रताप कोपनर उपस्थित होते.

शासनाने प्रति पाकिट निश्चित केलेल्या कपाशी बियाणाच्या निर्धारीत 901 रुपये किंमतीपेक्षा जादा दराने रूपये 1400 रुपये प्रती पाकीट विक्री दराने विक्री करीत असल्याबाबत सांगितले. मिळालेल्या माहीतीनुसार कृषि विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यास बियाणे खरेदीचे पैसे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सांगितले व दुकानदाराकडून खरेदीचे पक्के बिल घेण्यास सांगितले. यानुसार शेतकर्‍याने 1 पाकीट खरेदीचे फोनपेद्वारे 1400 रुपये संबंधीत दुकानदारास दिले आणि बिल मात्र रूपये 901 चे देण्यात आले. तसेच पनश्च 6 पाकीटे खरेदी केली असता रूपये 5406 रुपयांचे बिल देऊन फोनपेद्वारे पैसे मात्र 6300 रुपये घेण्यात आले. त्यानुसार कृषि केंद्राची तपासणी करून पंचनामा करण्यात आला.

कृषि केंद्रामध्ये बियाणे उपलब्धतेबाबतचा साठा व दराबाबतचा फलक लावण्याबाबत कायदयानुसार बंधनकारक असताना, सदर फलक आढळून आला नाही, मासीक अहवाल सादर करत नाहीत, ज्या कंपनीचे बियाणे विक्री करत आहेत, त्याबाबतचे स्त्रोत परवान्यामध्ये समाविष्ट केल्याचे आढळून आले नाही. या प्रकारच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या. तसेच शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार जबाब घेण्यात आले. त्यानुसार नेवासा पोलिस ठाण्यात मे. त्रिमुर्ती अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, पाचेगावचे प्रोप्रायटर प्रणय बाबासाहेब रोडे यांचेवर भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 318(4), बियाणे नियंत्रण आदेश 1983 मधील खंड 3,8,18, अत्यावश्यक वस्तु अधिनियम 1955 मधील कलम 3(1), 3(2)(सी), 3(2)(डी), 3(2)(ई), 7(फर्स्ट)(ए)(सेकंड) नुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. शेतकर्‍यांनी असे गैरप्रकार झाल्यास त्वरित कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांनी यावेळी केले.


खरीप हंगामामध्ये शेतकर्‍यांनी लागवडीसाठी घाई करू नये तसेच खते व बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे व गैरप्रकार अढळल्यास तत्काळ नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करावा. बाजारात खते व बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून शेतकर्‍यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
– सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles