अहिल्यानगर-सावेडी येथील डॉक्टरांच्या जमीन खरेदी-विक्रीच्या विविध व्यवहारांमध्ये विश्वास संपादन करून बनावट कागदपत्रे, बनावट मिळकती व खोटे मालक उभे करून तब्बल 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासानंतर या कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली.
माजी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे (रा. सावेडी, अहिल्यानगर), अमोल बबन जाधव (रा. मोरगव्हाण, ता. नेवासा), महेश नारायण कुर्हे आणि भारत फुलमाळी (रा. घोडेगाव, ता. नेवासा) अशी मोक्का कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी डॉ. अनिल आठरे (रा. झोपडी कॅन्टीन, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 8 नोव्हेंबर 2025 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जमीन खरेदी-विक्रीच्या वेगवेगळ्या व्यवहारांच्या माध्यमातून आपली फसवणूक करण्यात आल्याचे डॉ. आठरे यांनी फिर्यादीत नमूद केले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य संशयित स्वप्निल शिंदे, अमोल जाधव व त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून कट रचला. सुरुवातीला त्यांनी डॉ. आठरे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर जमीन व्यवहारासाठी विविध मिळकती दाखविण्यात आल्या. मात्र, या मिळकतींबाबत बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे, तर संबंधित जमिनींचे बनावट मालक उभे करून त्यांच्या नावाने बनावट सह्या करण्यात आल्या. या बनावट कागदपत्रांच्या आधारे डॉ. आठरे यांच्याकडे दस्त हस्तांतरित करण्यात आले. त्यानंतर जमीन व्यवहाराच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. अशा विविध व्यवहारांतून त्यांची एकूण 14 कोटी 66 लाख 51 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा शोध घेतला.
तपासादरम्यान अमोल जाधव याला अटक करण्यात आली. तसेच माजी नगरसेवक स्वप्निल शिंदे आणि महेश कुर्हे यांना नाशिक कारागृहातून ताब्यात घेऊन या फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींनी संगनमताने आर्थिक फसवणुकीचे कृत्य केल्याचे तपासात समोर आल्यानंतर, गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केला.
हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्यामार्फत नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पोलीस महानिरीक्षकांनी नुकतीच त्यास मंजुरी दिली. त्यामुळे जमीन व्यवहारातील कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या या प्रकरणाला आता मोक्काची जोड मिळाली आहे. आता या गुन्ह्याचा तपास शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे करत आहेत. दरम्यान यापूर्वी स्वप्नील शिंदे याच्या टोळीवर खुनाच्या गुन्ह्यात मोक्का कलमानुसार कारवाई करण्यात आली आहे.


