खर्डा (ता. जामखेड) येथे डोळ्यांत मिरची पावडर टाकून कोयत्याने डोक्यात वार करून तान्हाजी भास्कर बोराडे (रा. माळेवाडी, ता. भूम, जि. धाराशिव) यांचा खून करण्यात आला होता. या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून, चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये तीन विधीसंघर्षित बालकांचा समावेश आहे. दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी तान्हाजी भास्कर बोराडे हे खर्डा येथे असताना मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यांना जीवे ठार मारले. याप्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव तसेच पोलीस अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल, शामसुंदर जाधव, भाऊसाहेब काळे, अमोल आजबे, अजिनाथ पाखरे, रमीजराजा आत्तार, अरुण मोरे, फुरकान शेख आणि प्रशांत राठोड यांचे पथक तयार केले. या पथकाला आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून तपासासाठी रवाना करण्यात आले. तपास पथकाने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान दि.13 सप्टेंबर 2026 रोजी सदरचा गुन्हा प्रसाद अशोक अडागळे याने त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांसह केल्याची माहिती पथकाला मिळाली. तसेच गुन्ह्यातील मुख्य आरोपी पुणे येथे असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने पुणे शहरात जाऊन आरोपीचा शोध घेतला. त्यावेळी विधीसंघर्षित बालक (वय 17 वर्षे, रा. भूम,जि. धाराशिव) यास ताब्यात घेण्यात आले. यानंतर तपासादरम्यान इतर आरोपी टाकळीमिया, ता. राहुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन शोध घेतला असता प्रसाद अशोक अडागळे (वय 18 वर्षे, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर), विधीसंघर्षित बालक (वय 16 वर्षे, रा. कारखाना रोड, टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि विधीसंघर्षित बालक (वय 17 वर्षे, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या एका आरोपीसह तीन विधीसंघर्षित बालकांना गुन्ह्याच्या तपासकामी खर्डा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खर्डा पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.


