एक लाखाची लाच स्वीकारताना पोलिस अंमलदार लाचलुचपतच्या ताब्यात : नगर पोलिस दलात खळबळ

अहिल्यानगर – हाफ मर्डर आणि रॉबरीचा गुन्हा दाखल न करता सौम्य स्वरूपाचा मारामारीचा गुन्हा दाखल करून तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात पाच लाख रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर एक लाख रुपये स्वीकारणाऱ्या पाथर्डी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. विनोद शिवाजी मासाळकर (वय ३७), पोलीस अंमलदार, बकल नंबर २४६७, पाथर्डी पोलीस ठाणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या हॉटेलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाथर्डी गावातून मोटारसायकलवरून जात असताना एका ट्रकचालकाशी वाहनाला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यावर हाफ मर्डर आणि रॉबरीचा गुन्हा दाखल न करता गुन्ह्याचे स्वरूप सौम्य करून मारामारीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तसेच लवकर जामीन मिळवून देऊन तपासात मदत करण्यासाठी पोलीस अंमलदार विनोद मासाळकर यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ सप्टेंबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. यावेळी पंचांसमक्ष तडजोड होऊन २ लाख १५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य झाल्याचे विभागाने सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या कारवाईदरम्यान मागणी केलेल्या लाचेपैकी एक लाख रुपये स्वीकारताना विनोद मासाळकर यांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या अंगझडतीत Vivo V50 मोबाईल, १५ हजार १३० रुपये रोख आणि एटीएम कार्ड मिळून आल्याची माहिती आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाई पथकात पोहवा दिनेश खैरनार, पोहवा अविनाश पवार आणि पोशि योगेश शिंदे यांचा समावेश होता. तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्रीमती सविता तांबे कार्यरत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles