पवित्र प्रणालीद्वारे राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेतील रुपांतरित फेरीतून ४ हजार ३९० उमेदवारांची मुलाखतीशिवाय निवड प्रकारात शिफारस करण्यात आली आहे. शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, या उमेदवारांची २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत कागदपत्र पडताळणी करून ९ ऑक्टोबरपर्यंत पदस्थापना देण्यात येणार आहे.
शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या या बाबतची माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉ. नंदकुमार बेडसे, राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, राजेश शिंदे या वेळी उपस्थित होते. शिक्षक भरतीअंतर्गत अलीकडेच मुलाखतीविना निवड प्रकारात १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. त्यावेळी समांतर आरक्षण, राखीव प्रवर्गातील ६ हजार ६३५ पदांवर उमेदवार न मिळाल्याने ती पदे रिक्त राहिली होती. त्यापैकी समांतर आरक्षणातील पदांसाठी रुपांतरित फेरी राबवण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर रुपांतरित फेरीतून पात्र ठरलेल्या ४३९० उमेदवारांची शिफारस करण्यात आली. आता २ हजार २४५ पदे रिक्त राहिली आहेत.
शिक्षण आयुक्त सिंह म्हणाले, शिक्षक भरतीमध्ये मुलाखतीविना निवड प्रकारात शिफारस केलेल्या १३११९ उमेदवारांपैकी आतापर्यंत १८३० उमेदवार रूजू झाले आहेत. किती उमेदवार रूजू होतात याचे चित्र १० ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होईल. समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या जागांसाठी राबवलेल्या रुपांतरित फेरीमुळे आणखी उमेदवारांची निवड झाली आहे. यात पदवीधर शिक्षक, इयत्ता नववी-दहावी स्तर, उच्च माध्यमिक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कला, संगीत अशा विविध विषयांसाठी शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. या प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड होऊन शिक्षणाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न आहे.


