Friday, February 20, 2026

एकाच कुटुंबातल्या सात जणांची सामूहिक आत्महत्या, विष पिऊन संपवलं आयुष्य; कुठे घडली घटना?

हरियाणातील पंचकुला या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कारमध्ये सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. हे सातही जण एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. या सातजणांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब देहरादून येथील आहे. कर्जाचा डोंगर वाढू लागल्याने कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची माहिती आहे.
पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांनी काय सांगितलं?

“ओजस रुग्णालयात सहा जणांना आणण्यात आलं आहे, तर आणखी एकाला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं आहे. या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी हे प्रकरण सामूहिक आत्महत्येचं वाटतं आहे. पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचलं आहे. याबाबत पुढचा तपास झाल्यानंतर आम्ही काय घडलं ते माध्यमांना सांगू. एकाच कुटुंबातल्या सदस्यांनी आत्महत्या केली आहे. या कुटुंबाची ओळख पटली असली तरीही आम्ही माध्यमांना त्याबाबत माहिती देणार नाही.” असं हिमाद्री कौशिक यांनी सांगितलं.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी त्यांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे. त्यामध्ये काय लिहिलं आहे? याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या सगळ्यांनी विष घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री उशिरा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पंचकुला येथील सेक्टर २७ च्या घर क्रमांक १२०४ च्या बाहेर एक कार उभी होती. या कारमध्ये काही लोक बसले होते आणि ते तडफडत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या सगळ्यांना रुग्णालयात दाखल केलं. पण सातही जणांचा मृत्यू झाला. सगळ्यांची प्रकृती इतक्या मोठ्या प्रमाणावर बिघडली होती की कुणाचाही जीव वाचू शकला नाही. आता याबाबत पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त हिमाद्री कौशिक यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबाचा प्रमुख देहरादून या ठिकाणी ट्रॅव्हलचा व्यवसाय करत होता. मात्र या व्यवसायात नुकसान झाल्याने कुटुंबावर कर्जाचा बोजा वाढला. या वाढलेल्या कर्जातूनच या सगळ्यांनी सामूहिक आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान मृतदेहांचा शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर तसंच तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाची पुढील माहिती माध्यमांना दिली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles