Friday, February 20, 2026

जिल्ह्यात मुला-मुलींच्या समान लिंगगुणोत्तरासाठी गावपातळीवर मुलींच्या जन्माविषयी व्यापक जागृती, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

*मुला-मुलींच्या समान लिंगगुणोत्तरासाठी गावपातळीवर मुलींच्या जन्माविषयी व्यापक जागृती करा*
*- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया*

अहिल्यानगर, दि. २७ – जिल्ह्यात मुला-मुलींच्या लिंगगुणोत्तराचे प्रमाण समान राहण्याच्यादृष्टीने गावपातळीवर मुलींच्या जन्माविषयी व्यापक स्वरुपात जागृती करावी. तसेच गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायदा व आरोग्य विभागाच्या विविध योजनांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते.

बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, पोलीस उपअधीक्षक जी.आर.उगले, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नंदकुमार नेहरकर, जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. सतीष पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी सतीष राजुरकर, विधी समुपदेश ॲड. सारीका सुराशे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी असलेले प्रमाण समान होण्याच्यादृष्टीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षपणे काम करावे. अनाधिकृतपणे गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्राची माहिती घेऊन केंद्राची तपासणी करावी. ‘आमची मुलगी’ या सार्वजनिक तक्रार प्रणालीबाबतचे माहिती फलक जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, प्राथमिक रुग्णालयात दर्शनी भागात लावण्यात यावेत. लिंगगुणोत्तराची गावनिहाय माहिती एकत्रित करत ज्या गावांमध्ये लिंगगुणोत्तराचे मुलींचे प्रमाण कमी आहे अशा गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्यांतर्गत न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या खटले गतीने निकाली निघावेत यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

पावसाळयात उद्भवणाऱ्या डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यासारख्या आजाराच्या प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात. महानगरपालिका क्षेत्र तसेच लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावांमध्ये गृहभेटीचे नियोजन करत नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून आजारांची पूर्वलक्षणे शोधावी. डास निर्मूलनासाठी किटकनाशक फवारणी, साचलेले पाणी हटवणे आणि निर्जंतुकता राखण्यावर भर द्यावा. खासगी दवाखान्यांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती प्रशासनाकडे सादर करण्यात यावी. जिल्ह्यातील जन्म-मृत्यूच्या नोंदीबाबतही कार्यवाही करण्याच्या सूचनाही डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी दिल्या.
खबरी बक्षिस योजनेंतर्गत १ लाख रुपयांचे बक्षिस

बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान व लिंग निदान करुन गर्भपात करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध तक्रार देणाऱ्या व्यक्तीस दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी होऊन न्यायालयात गुन्हा दाखल झाल्यास शासनामार्फत एक लक्ष रुपयांचे बक्षिस देण्यात येते. तसेच संशयित केंद्रात गर्भवती महिलेच्या मदतीने स्टींग ऑपरेशन करुन गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांना रंगेहाथ पकडण्याकरिता शासनास मदत केलेल्या गरोदर महिलेसही शासनामार्फत एक लक्ष रुपयांचे बक्षिस देण्यात येते. जनतेची काही तक्रार असल्यास ‘आमची मुलगी’ या सार्वजनिक तक्रार प्रणालीच्या १८००२३३४४७५ (१०४) या क्रमांकावर अथवा http://amchimulgimah.in या संकेतस्थळावर तक्रार करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंगनिदान प्रतिबंध कायद्यांतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles