सोनगाव दफनविधीनंतर काही दिवसांनी मृत समजण्यात आलेला शब्बीर जमादार मन्सुरी जिवंत परतल्याने राज्यभर चर्चेत आलेल्या राहुरी तालुक्यातील सोनगाव येथील गूढ प्रकरणात गुरुवारी 4 वाजता महत्त्वपूर्ण घडामोड घडली. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रशासनाने कब्रस्तानात दफन करण्यात आलेला मृतदेह बाहेर काढून त्याचे दुसर्यांदा जागेवरच शवविच्छेदन व डीएनए नमुने संकलित केले. आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पुन्हा त्याच ठिकाणी दफन करण्यात आला.
नायब तहसीलदार श्री. बाचकर यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामीण रुग्णालय राहुरीचे डॉ. मिसाळ, प्राथमिक आरोग्य केंद्र गुहा येथील गणेश आडभाई, संगमनेर पोलीस स्टेशनचे सचिन सोनवणे व श्री. उगले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच शब्बीर मन्सुरी यांचे नातेवाईक व ग्रामस्थांच्या साक्षीने मृतदेह बाहेर काढून डीएनए नमुने घेण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी हरवलेले व मतिमंद असलेले शब्बीर मन्सुरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एका अज्ञात मृतदेहाची ओळख शब्बीर मन्सूरी म्हणून पटविण्यात आली होती.त्यानंतर धार्मिक परंपरेनुसार मृतदेहाचा दफनविधी करण्यात आला. मात्र काही दिवसांनी शब्बीर मन्सुरी हे जिवंत अवस्थेत घरी परतल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. त्यामुळे कब्रस्तानात दफन झालेला मृतदेह नेमका कोणाचा, हा प्रश्न अनुत्तरित राहिला होता.
या प्रकरणी दैनिक सार्वमतमध्ये वृत्त प्रकाशित झाल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस व प्रशासनाने वैज्ञानिक तपासाचा मार्ग स्वीकारत मृतदेहाचा डीएनए चाचणीचा निर्णय घेतला. यावेळी संकलित नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येणार असून अहवालानंतर मृत व्यक्तीची खरी ओळख समोर येण्याची शक्यता आहे. या अभूतपूर्व घटनेमुळे सोनगावसह संपूर्ण राहुरी तालुक्यात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शब्बीर मन्सूरी जिवंत परतल्यानंतर दफन केलेला मृतदेह कोणाचा होता ? त्याच्या नातेवाईकांचा शोध लागणार का ?आणि मृत्यूमागील सत्य काय ? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. संबंधित मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणी हा सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर या गूढ प्रकरणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्याची अपेक्षा असून जिल्हाभर चर्चेत असलेल्या या घटनेवरील रहस्याचा पडदा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


