शेवगाव तालुक्यातील युवकावर नगरमध्ये चाकूने हल्ला

अहिल्यानगर -कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका 19 वर्षीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना गुलमोहर रस्त्यावरील आनंद शाळेसमोर सोमवारी (11 मे) सायंकाळी घडली. अभिषेक सोमनाथ लांडगे (वय 19 रा. गुलमोहर रस्ता, अहिल्यानगर, मुळ रा. दहिगाव-ने, ता. शेवगाव) असे जखमी युवकाचे नाव आहे.

त्याच्यावर येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून त्याने दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश विश्वास जायभाय (रा. दूध सागर सोसायटी, केडगाव) व त्याच्यासोबतच्या तीन साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अभिषेक लांडगे हा अहिल्यानगरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याचा मित्र संतोष महाडिक आणि विशाल नागरगोजे यांच्यात कॉलेजमध्ये भांडण झाले होते. याच वादाचा राग मनात धरून अविनाश जायभाय याने संतोषला फोनवरून शिवीगाळ केली आणि चर्चेसाठी बोलावले.

सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अभिषेक, संतोष आणि रोहन लांडगे हे गुलमोहर रस्त्यावरील नाथकृपा इंटरप्राईजेस कार्यालयाबाहेर आले असता, तिथे अविनाश जायभाय आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तीन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. यावेळी झालेल्या झटापटीत अविनाशने अभिषेकवर चाकूने वार केले. यात तो जखमी झाला. संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. जखमी अभिषेकवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास महिला पोलीस अंमलदार प्रियंका राऊत करीत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles