२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. अल्पावधीतच योजना प्रसिद्ध झाली आणि निवडणुकीत महायुतीला त्याचा लाभ झाला. महायुतीला निकालात घवघवीत यश मिळाले. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून अभियानाची घोषणा केली आहे. ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत असताना शिंदे यांनी ही घोषणा केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात या अभियानाची सुरुवात केली. “आजपासून आपण नवीन अभियान सुरू करत आहोत. ते लाडक्या सुनेंसाठी महत्त्वाचे आहे. सासर काही वाईट नसते, पण काही मोजक्या ठिकाणी अप्रिय घटना घडत असतात. आपली मुलगी जशी लाडकी असते, त्याचप्रमाणे सूनही लाडकी व्हावी, यासाठी शिवसेनेने हेल्पलाईन सुरू केली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी हेल्पलाईनचे क्रमांकही जाहीर कार्यक्रमात सांगितले. ते पुढे म्हणाले, ज्या सुनांना अडचण येईल, त्यांनी न घाबरता या क्रमांकावर फोन करावा. त्यांनी दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. लाडकी सून अभियानामार्फत पीडित सूनेला सुरक्षा दिली जाईल. ज्या सूना आहेत, त्याही माझ्या लाडक्या बहिणी आहेत. एकनाथ शिंदे त्यांचा भाऊ आहे. कुणीही त्यांच्यावर अन्याय-अत्याचार करेल, त्याची गाठ शिवसेनेशी आहे, हे मी सांगतो.
लाडक्या सुनेचे रक्षण हेच शिवसेनेचे वचन’ या अभियानाची घोषणा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महिलांच्या आरोग्यासाठीही एक अभियान सुरू केल्याचे सांगितले. “महिला कुटुंबासाठी सर्व काही करतात, पण स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आपली नियमित तपासणी करून घेण्यासाठी ठाणे मनपा आणि रोटरी क्लबच्या पुढाकाराने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियान’ सुरू करण्यात आले असून जास्तीत जास्त महिलांनी त्यांचा लाभ घ्यावा”, असे आवाहन त्यांनी केले.
आतातरी योजना सुरू करण्याचा निर्णय नाही – अजित पवार
राज्य सरकार लाडकी सूनबाई योजना सुरू करणार असल्याची चर्चा रविवारी दिवसभर रंगल्यानंतर अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. जळगाव येथील पत्रकार परिषदेत सदर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, अशी कोणतीही योजना राज्य सरकारने सुरू केलेली नाही. सरकारला जेव्हा योजना सुरू करायची असते तेव्हा त्याची चर्चा कॅबिनेट बैठकीत केली जाते. त्यानंतर योजना अमलात येते. सध्यातरी अशी योजना सुरू करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. तसेच चांगल्या योजनेसाठी सरकार तयार असते, असे उत्तर अजित पवार यांनी दिले.


