शिर्डीत एका सराफ व्यावसायिकाची लाखो रुपयांची फसवणूक करणार्या आरोपीला शिर्डी पोलिसांनी गुजरात राज्यातील बडगावमधून अटक केली आहे. या आरोपीने व्यावसायिकाकडून 3 कोटी 26 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. आरोपीने स्वतःला ड्रायव्हर असल्याचे भासवून ही फसवणूक केली होती.मूळचे बनसकाठा (गुजरात) येथील असलेले, शिर्डी येथे सराफ व्यवसायाशी संबंधित असलेले व्यापारी विजयसिंग वसनजी खिसी यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यांनी शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई आणि अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिक आणि ग्राहकांकडून सोने विक्रीसाठी आणले होते. याचदरम्यान 13 मे 2024 रोजी त्यांचा ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंग राजपुरोहित (राह. चोहटन, जि. बारमेर, राजस्थान) याने शिर्डी येथील हॉटेल साई सुविधा येथे मुक्कामी असताना 3 कोटी 26 लाख रुपये किंमतीचे 2687 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पलायन केले.
या घटनेची तक्रार मिळाल्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम 306 आणि 396(2) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, शिर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कवडी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अमृत आढाव, भगवान थोरात, प्रशांत राठोड यांचा समावेश होता.
या विशेष पथकाने तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशकुमार भुरसिंग राजपुरोहित हा गुजरात राज्यात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिर्डी पोलिसांनी गुजरात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने त्याला गुजरातच्या साबरकाटा जिल्ह्यातील तलोद येथून ताब्यात घेतले. आरोपीला पुढील तपासकामी शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत.


