नगरचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या अपप्रवृत्तींसह त्यांच्या मास्टरमाईंडवरही कारवाई व्हावी : अभिषेक कळमकर
नगरच्या जनतेने चुकीच्या समाजविघातक प्रवृत्तींनी थारा देऊ नये, बाजारपेठेवर विपरीत परिणाम होण्याची भीती
नगर; अहिल्या नगर शहरात ऐन सणासुदीच्या काळात सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी घटना घडली आहे. आज पहाटे काही समाजकंटकांनी जेसीबी आणून गांधी मैदान ते पटवर्धन चौक रस्त्यांवरील पुरातन दर्गा पाडण्याचा प्रयत्न केला. सध्या गणेशोत्सव, नवरात्र अशा सणांचे वातावरण असताना जाणूनबुजून समाजविघातक प्रवृत्तींनी शहराची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना जेसीबीसह ताब्यात घेतले असले तरी या घटनेमागील मास्टर माईंड शोधून कारवाई केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी दिली आहे.
कळमकर म्हणाले ऐतिहासिक नगर शहराला ५०० वर्षांचा इतिहास आहे. सर्व जाती धर्माचे लोक इथं गुण्यागोविंदाने नांदत आहेत. एकमेकांच्या प्रार्थना स्थळांचा आदर केला जातो. पटवर्धन चौकातील दर्गाही हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या भागात कधीही सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी घटना घडली नाही. मात्र आता नगर शहरात जाणूनबुजून आक्षेपार्ह वक्तव्य, कृती करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी कृत्ये केली जाते आहे. वास्तविक जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहराचे नाव नुकतेच अहिल्यानगर करण्यात आले. सर्वत्र त्याचे स्वागतच झाले. अशा वेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिप्रेत असणारा सामाजिक सलोखा राखणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. विशेषतः नगरचे पालकमंत्री, सत्ताधारी यांनी विशेष लक्ष घातले पाहिजे. दुर्दैवाने शहरात बाहेरची मंडळीही येऊन सामाजिक सलोखा बिघडवणारी वक्तव्य करीत आहेत. यातून शहराची ऐतिहासिक परंपरा मलिन होत आहे. आधीच डबघाईला आलेली बाजारपेठ उद्ध्वस्त होण्याची भीती आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीला आळा घालून अवैध धंद्यांना वेसण घालण्यासाठी विशेष काम चालवले आहेत. यातून हितसंबंध दुखावलेल्या प्रवृत्तीकंडून असं सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे प्रकार मुद्दामहून केले जात आहेत का याचाही सखोल तपास होणे गरजेचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हवा
आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना कधीच परधर्माचा अनादर केला नाही. त्यांनी अपप्रवृत्तींचा नायनाट करून रयतेचे राज्य निर्माण केले. दुर्दैवाने आज धर्माच्या नावाखाली काही समाजविघातक प्रवृत्तींनी डोके वर काढले आहेत. यातून राजकीय पोळी भाजण्याचा कुटिल डाव साधला जात आहे. नगरच्या जनतेने अशा चुकीच्या प्रवृत्तींना थारा न देता सामाजिक सलोखा आणि एकोपा कायम राखावा असे आवाहन अभिषेक कळमकर यांनी केले आहे.


