कॉलेज तरुणीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल; सावेडी परिसरातील घटना
अहिल्यानगर : कॉलेजला जाताना आणि घरी येताना एका तरुणीचा सतत चोरून पाठलाग करून तिला त्रास देणाऱ्या एका विकृत तरुणाविरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सावेडी उपनगरातील निर्मलनगर परिसरात घडली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच कॉलेजमध्ये शिकणारा आरोपी सागर संजय टोकेकर (रा. केडगाव देवी, शिवाजीनगर) हा गेल्या काही दिवसांपासून या तरुणीवर पाळत ठेवत होता. पीडितेने त्याला अनेकदा बजावून देखील त्याने तिचा पाठलाग करणे थांबवले नाही. डिसेंबर महिन्यापासून आरोपीने तरुणीच्या घरासमोर मोटारसायकलवरून येऊन तिला हातवारे करणे आणि तिचा पाठलाग करणे सुरूच ठेवले होते.
दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी आरोपी पुन्हा तरुणीच्या घरासमोर आला आणि त्याने तिला आवाज देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला. या सततच्या त्रासामुळे आणि छेडछाडीमुळे पीडित तरुणीने अखेर धाडस दाखवून तोफखाना पोलीस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ (२) नुसार आरोपी सागर टोकेकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोसावी करत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाटेफळ शिवारातील हायवेवर भीषण अपघात
अहिल्यानगर – तालुक्यातील वाटेफळ शिवारात असणाऱ्या विश्वशांती हॉटेलजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दत्तात्रय कोंडीबा गाडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश दत्तात्रय गाडे आणि त्यांचे वडील दत्तात्रय गाडे हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक MH-16-DU-5344) जात असताना ही घटना घडली. अज्ञात वाहनावरील चालकाने आपले वाहन भरधाव वेगात आणि हयगईने चालवून फिर्यादीच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत फिर्यादीला गंभीर दुखापत झाली, तर त्यांचे वडील दत्तात्रय गाडे यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर अज्ञात चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे. फिर्यादीने दिलेल्या दवाखाना जबाबावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार वांढेकर हे सपोनि प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. महामार्गावरील वाढत्या अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


