अहिल्यानगर-दोन विवाह झालेले असतानाही घटस्फोटाचा खोटा पुरावा दाखवून तिसरे लग्न करणाऱ्या पतीला मुख्य न्यायदंडाधिकारी एल. एस. पाढेण यांनी दोन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. जयदीप कौशिक मोरे (वय ३४, रा. अभियंता कॉलनी, औरंगाबाद रोड, अहिल्यानगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, आरोपीने फिर्यादी महिलेची फसवणूक करून तिच्याशी विवाह केला होता. आरोपीचे पूर्वी दोन विवाह झाले होते, तरीही त्याने दुसऱ्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचा बनावट पुरावा सादर केला. तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम ४९४, ४९८ अ, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटला मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालला.
अभियोग पक्षाच्या वतीने एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले. पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी जयदीप मोरे याला कलम ४९४ (दुसरा विवाह करणे) अंतर्गत दोषी ठरवले. दंडाची १० हजार रुपये रक्कम फिर्यादी महिलेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पुराव्याअभावी इतर पाच आरोपींची छळवणूक आणि इतर कलमांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने कनिष्ठ वकील अमित यादव आणि सीमा शेख यांनी काम पाहिले. त्यांना तपास अधिकारी पोलीस हवालदार एस. डी. मोरे आणि पैरवी अधिकारी सहायक फौजदार नितीन गायकवाड यांनी सहकार्य केले. अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात या निकालाची मोठी चर्चा सुरू होती.


