पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
अहिल्यानगर – खरीप व रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पीकस्पर्धा २०२५-२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या पीक स्पर्धेमध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येऊन उत्पादकतेमध्ये वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पाकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांचे मनोबल वाढून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडेल, या उद्देशाने राज्यांतर्गत या पीकस्पर्धा राबविण्यात येत आहेत.
सर्वसाधारण व आदिवासी गटसाठी तालुकास्तरावरील पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेअंतर्गत खरीप पीकासाठी ११ व रब्बी हंगामातील ५ अशा एकूण १६ पिकांसाठी स्पर्धा घेतली जाणार असून तालुका, जिल्हा व राज्य या तीन स्तरावर स्पर्धकांची निवड होणार आहे.
खरीप पिकामध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मुग, उडिद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल तर रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ५ पिकांचा समावेश आहे. खरीप हंगामातील मुग व उडीद पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भूईमुग, सूर्यफुल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२५ तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा, करडई, जवस पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२५ अशी आहे.
तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे ३ हजार तर तृतीय बक्षीस २ हजार रुपये एवढे आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार रुपये, दुसरे ७ हजार तर तृतीय बक्षीस ५ हजार रुपये एवढे आहे. राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार रुपये, दुसरे ४० हजार तर तृतीय बक्षीस ३० हजार रुपये एवढे आहे.
पीक स्पर्धेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
- Advertisement -


