Tuesday, March 24, 2026

दिंडीच्या विरोधात बोलणाऱ्या अबू आजमीला धडा शिकवण्याचे काम करणार, आमदार संग्राम जगताप यांचा इशारा

सावेडीत सद्गुरु गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याचा भव्य रिंगण सोहळा संपन्न

पांडुरंगाच्या भक्तीतून आनंदी व अर्थपूर्ण जीवन जगता येते – महंत रामगिरी महाराज

कै. नानासाहेब बारस्कर कुटुंबियांच्या वतीने वारकऱ्यांचे मनोभावे स्वागत

अहिल्यानगर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, सावेडी परिसरात पारंपरिक आणि भक्तिभावाने परिपूर्ण असलेल्या सद्गुरु श्री गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या रिंगण सोहळ्याला भव्य उत्साहात सुरुवात झाली. वारकरी संप्रदायातील एक महत्त्वपूर्ण सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिंडीचे यंदा देखील विविध धार्मिक आणि सामाजिक स्तरावर स्वागत करण्यात आले. या पवित्र दिंडी सोहळ्याचे कै. नानासाहेब बारस्कर कुटुंबियांच्या वतीने मनोभावे स्वागत करण्यात आले. गेल्या ३५ वर्षांपासून बारस्कर कुटुंबीय वारकऱ्यांची सेवा करत असून, ही परंपरा यंदाही तितक्याच भक्ती-भावाने जपली गेली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पवित्र पालखीचे विधीवत पूजन करण्यात आले. महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रिंगण सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला दिसून आला.
महंत रामगिरी महाराज यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना सांगितले की, “महाराष्ट्राला संत महंतांची थोर परंपरा लाभली असून, पांडुरंगाच्या भक्तीतून आनंदी व अर्थपूर्ण जीवन जगता येते. गंगागिरी महाराज यांना ज्ञानेश्वरी आणि वारी यांची गहिरी आस्था होती. आजही त्याच परंपरेचा वारसा हे पायी दिंडी सोहळे जपत आहेत. यावेळी सोहळ्यात आ. संग्राम जगताप, भिमाबाई बारस्कर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर, माजी नगरसेविका दीपालीताई बारस्कर, सचिन बारस्कर, सतीश बारस्कर, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. मोठ्या संख्येने वारकरी, महिला भक्तगण, नागरिक सहभागी झाले होते.
रिंगण सोहळ्यात उंच उंच पताका, टाळ- मृदंगाचा गजर, भक्तीमय अभंग व विठुरायाच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विविध वयोगटातील वारकऱ्यांचा उत्साह व भक्तिभाव पाहता हे श्रद्धेचे दर्शन होते. सावेडी परिसरात या पवित्र सोहळ्यामुळे धार्मिकता आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बारस्कर कुटुंबीयांनी घेतलेले परिश्रम आणि समर्पण भाविकांच्या मनात आदर निर्माण करणारे ठरले. श्रद्धा, सेवा आणि परंपरेचा संगम असलेल्या या रिंगण सोहळ्याने पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाच्या गौरवशाली इतिहासाची उजळणी केली.

महाराष्ट्राला हजारो वर्षाची वारकऱ्यांची परंपरा लाभली आहे, धकाधकीच्या काळामध्ये मनुष्यमध्ये मनोविकार होण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यांना शांती देण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो. वारकरी संप्रदायाने कधीही जाती धर्माचा विचार केलेला नाही, सर्वांना बरोबर घेऊन चालत आला आहे, समाजामध्ये विकृत पद्धतीचे काही लोक असतात त्यांच्या बोलण्याकडे आपण दुर्लक्ष केले पाहिजे, आणि समाजामध्ये चांगले कार्य केले पाहिजे. अबू आजमी सारख्या नालायक माणसाला धडा शिकवण्याची खरी गरज आहे, असे माणसं समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत असतात असे मत महंत रामगिरी महाराज यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनुष्य घडला जातो. महिला आपल्या कुटुंबामध्ये संत महंतांचे विचार पोहोचवीत असतात, त्या माध्यमातून सुसंस्कृत पिढी निर्माण होत असते. बाळासाहेब बारस्कर कुटुंबियांच्या वतीने वारकऱ्यांची सेवा करत समाजामध्ये धार्मिकतेचा वारसा जोपासण्याचे काम केले जात आहे. वारकऱ्यांच्या माध्यमातून आपली भूमी पावन होत असते, त्यातून आपल्याला प्रेरणा व ऊर्जा मिळत असून नवचैतन्य निर्माण होते. दिंडीच्या विरोधात बोलणाऱ्या अबू आजमीला धडा शिकवण्याचे काम केले जाईल. असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला.

पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारकरी जात असताना, त्यांची सेवा करण्याचे काम सर्वांनी केले पाहिजे. कै. नानासाहेब बारस्कर यांनी गेल्या 35 वर्षांपूर्वी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज पायी दिंडी सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मनुष्याला अध्यात्मिकतेची गोडी लागत असते. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत असतात, सद्गुरु गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या दिंडीची सेवा करण्याचे काम आमच्या कुटुंबाला मिळाले ही भाग्याची गोष्ट आहे. अशी भावना मा नगरसेविका दिपालीताई बारस्कर यांनी व्यक्त केली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles