अहिल्यानगर दि. १० प्रतिनिधी चिचोंडी पाटीलमध्ये ₹६५ लाखांच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन; विविध विकासकामांचा शुभारंभ
चिचोंडी पाटील येथे ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ आणि सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खासदार निलेश लंके यांची ग्रामस्थांच्या वतीने लाडू तुला करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या ₹६५ लाख रुपयांच्या बंधाऱ्याचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.
याप्रसंगी सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन दिलीप दत्तात्रय पवार आणि व्हा. चेअरमन बबन कोकाटे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चिचोंडी पाटीलचे कार्यसम्राट, लोकप्रिय सरपंच प्रशासक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरदभाऊ पवार यांचे हायकोर्टाच्या आदेशानंतर ग्रामस्थांच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला चिचोंडी पाटीलसह नगर तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामस्थ, महिला भगिनी, निलेश लंके प्रतिष्ठान, आपला मावळा आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले, “ग्रामस्थांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वाद हीच माझी खरी ताकद आहे. विकासकामे थांबणार नाहीत आणि जनतेच्या हक्कासाठी संघर्षही थांबणार नाही.”


