महापालिका कामगारावरील हल्ल्यानंतर तीन आरोपी हैदराबाद येथून जेरबंद :, पलायनास मदत करणारे दोघेही ताब्यात

मुकुंदनगर येथील दर्गा दायरा परिसरात पथदिव्याच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचारी धीरज कचरूसिंग रजपूत (परदेशी) यांच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी तत्पर कारवाई केली. पसार झालेल्या तीन मुख्य आरोपींच्या मुसक्या अवघ्या 24 तासांत हैदराबादमध्ये आवळण्यात त्यांना यश आले. आरोपींना हैदराबादला पळून जाण्यास मदत करणार्‍या आणखी दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांच्या कारवाईतील आरोपींची संख्या सहा झाली आहे.

फिर्यादी अक्षय मुळे हे धीरज परदेशी यांच्यासह सहकार्‍यांना घेऊन दर्गा दायरा परिसरात पथदिव्याच्या दुरूस्तीचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मेहराज अस्लम सय्यद, सिराज अस्लम सय्यद, मुस्तकीम अस्लम सय्यद, युनूस शेख आणि अन्य दोन ते तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात धीरज परदेशी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना पसार आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने विशेष तपास पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.

पोलिसांनी बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यासह तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. तपासादरम्यान मुख्य आरोपी हैदराबादमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खात्री होताच स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तातडीने हैदराबादकडे रवाना झाले. हैदराबाद शहर पोलिसांच्या कमिशनर टास्क फोर्स आणि खैरताबाद झोनच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. मुस्तकीम ख्वाजामिया सय्यद (वय 20), मेहराज इब्राहिम सय्यद (वय 22) आणि सिराज इब्राहिम सय्यद (वय 21, तिघेही रा. आलमगीर मदरशाजवळ, भिंगार) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी हल्ल्यात सहभागाची कबुली दिल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथून रेल्वेने हैदराबादला गेल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, आरोपींना शहराबाहेर पळून जाण्यास कोणी मदत केली, याचा तपास सुरू असताना ख्वाजामियॉ उर्फ अकरम याकुब सय्यद (वय 52, रा. आलमगीर) आणि वसीम रहिम सय्यद (वय 47, रा. वाबळे कॉलनी, फकीरवाडा, मुकुंदनगर) यांनी आरोपींना हैदराबादला पळून जाण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, तसेच अंमलदार संदीप पवार, विजय ठोंबरे, फुरकान शेख, गणेश धोत्रे, शाहीद शेख, राहुल डोके, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, राहुल व्दारके, रमिझराजा आतार, अरूण मोरे, अभिजीत अरकल यांच्यासह शिर्डी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण आणि पोलीस अंमलदार कैलास राठोड सहभागी झाले होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles