थकबाकीदार गाळेधारकांवर महानगरपालिकेची जप्ती कारवाई सुरू
रंगभवन व्यापारी संकुलातील २० गाळेधारकांनी कारवाई टाळण्यासाठी भरले ४८.९६ लाख
वसुलीसाठी दिलेले धनादेश न वाटल्यास तत्काळ गाळा जप्त करून खटला दाखल करणार : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर – महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्ती मोहीम सुरू केली आहे. मार्केट विभागाच्या पथकाने गुरुवारी सहाय्यक आयुक्त सपना वसावा यांच्या नेतृत्वाखाली सर्जेपुरा येथील रंगभवन व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळेधारकांवर जप्ती कारवाईचा बडगा उगारतच २० गाळेधारकांनी थकीत रकमेचा धनादेश जमा केला आहे.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार शहरातील महानगरपालिकेच्या गाळे, खोल्या, कार्यालये आदींकडे असलेल्या भाड्याच्या थकीत वसुलीसाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदार गाळेधारकांना यापूर्वीच जप्ती कारवाईच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. नोटीसीची मुदत संपल्यानंतर आता मार्केट विभागाकडून जप्ती कारवाई व वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी सहाय्यक आयुक्त सपना वसावा व मार्केट विभाग प्रमुख सतीश पुंड, वसुली लिपिक करण डापसे, संकेत कोतकर, राहुल झिंजे, शिवराम गवांदे, आसाराम गुंड, तुळशीराम जगधने, शिवाजी गाढवे यांच्या पथकाने सर्जेपुरा रंगभवन व्यापारी संकुलातील ३९ थकबाकीदारांपैकी २० गाळेधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. या २० गाळेधारकांनी कारवाई टाळण्यासाठी ४८.९६ लाख रुपयांची थकबाकी धनादेशाद्वारे जमा केली आहे.
दरम्यान, महानगरपालिकेने सर्वच थकबाकीदार गाळेधारकांवर कारवाई सुरू केली आहे. सुमारे २५ कोटींची थकबाकी आहे. नोटीसा बजावूनही थकबाकी भरत नसतील तर आता कठोर कारवाई करण्याशिवाय महानगरपालिकेकडे पर्याय नाही. सर्व थकबाकीदारांना अनेकवेळा आवाहन करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी तत्काळ थकीत भाडे जमा करावे, असे आवाहन करतानाच वसुलीवेळी दिलेले धनादेश न वाटल्यास तत्काळ गाळा ताब्यात घेऊन फौजदारी खटला दाखल केला जाईल, असा इशाराही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.


