बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. २० वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर पतपेढीची ही निवडणूक लिटमस चाचणी असल्याचे बोलले जात होतं. पण यामध्ये ठाकरे ब्रँडला भोपळाही फोडता आला नाही. ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला २१ पैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय स्थानिक पातळीचा आहे. छोट्या विषयाची इतकी मोठी चर्चा गरजेची नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई-पुणे-नाशिकसह मोठ्या शहरातील पार्किंग, टाऊन प्लॅनिंग आणि पावसामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी फडणवीस यांची भेट घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. पार्किंग समस्या, वाहतूक कोंडी, परप्रांतीयांचा लोंढा, कबुतरखान्याचा वाद आणि शहरी पुनर्विकासातील अनियमितता या मुद्द्यांवर राज ठाकरे बोलले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अचानक देवेंद्र फडणीस यांची भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्र्यांची भेट नेमकी का घेतली? याबाबातही राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. टाऊन प्लॅनिंगसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी शहरातील वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे टाऊन प्लॅनिंगसंदर्भातील आराखडा दिला. मुख्यमंत्र्यांना का भेटलो होते, याबाबत राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. राजकारणावर बोलणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. पण पत्रकारांनी राज ठाकरे यांना बेस्ट पतपेढी निवडणुकीबाबत प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी संतापले अन् आपलं मत व्यक्त केले.
पतपेढीतील पराभवावर राज ठाकरे म्हणाले हा विषय मला माहिती नाही. त्यावर पत्रकारांनी त्यांना विषय समजवलं. मराठी माणसाने ठाकरेंना का नाकारले, याबाबत काही विश्लेषण करण्यात आले का? त्यावर राज ठाकरे संतापले अन् म्हणाले हा छोटा विषय आहे.
हो मी वाचलं… काय आहे ते? मला माहितीच नाही हा विषय. बेस्ट पतपेढीच्या स्थानिक निवडणुका आहेत. त्याबाबत मला तेवढं माहिती नाही. हा काही इतका मोठा विषय नाही. या छोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला २४ तास काहीतरी दाखवायला हवं. याची आग लावा, त्याची आग लावा, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली.


