अहिल्यानगर-जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी 14 जून रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यासंदर्भात नागरिकांना 21 जुलैपर्यंत प्रशासनाकडे हरकती नोंदवता येणार असून आतापर्यंत जिल्ह्यातून केवळ पाच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या प्रारूप गट-गण प्रभाग रचनेवर हरकती घेण्यासाठी कार्यालयीन दोनच दिवश शिल्लक राहिलेले आहेत. शनिवार, रविवारी शासकीय सुट्टी असून यामुळे आज शुक्रवारी व सोमवार (दि.21) रोजी हरकती दखल करण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 75 गट आणि 14 पंचायत समित्यांच्या 150 गणांसाठी 2011 ची लोकसंख्या गृहीत धरीत जिल्हाधिकारी यांनी मागील सोमवार (दि.14) रोजी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केली. ग्रामपंचायत विभागाच्या निवडणूक शाखेने जाहीर केलेली या प्रारुप प्रभाग रचना काहींना अडचणीची तर काहींना सोईची झाली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला गती मिळाली असताना इच्छुकांनी देखील गट, गणात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचा अभ्यास सुरु केला आहे. नवीन प्रभाग रचनेत अकोले तालुक्यातील लहित खुर्द गावाचा ब्राम्हणवाडा गणात समावेश करण्यात आला.
लहित खुर्दचे सरपंच यांनी कोतूळ गणात गावाचा समावेश करण्याची मागणी केली आहे. राहुरी तालुक्यातील गुहा गटाचे नाव बदलून पूर्ववत सात्रळ गट करण्याची मागणी एका तक्रारदाराने केली आहे. नगर तालुक्यातील डोंगरगणचे उपसरपंच यांनी गावाचा जेऊर गटात समावेश न करण्याची मागणी केली आहे. पारनेर तालुक्यातील वडनेर बुद्रुक गाव निघोज गणात घेणे अपेक्षित असताना अळकुटी गणात गेल्याची तक्रार करण्यात आली आहे. तसेच पाठवाडी गाव जवळा गणात घेणे अपेक्षित असताना निघोज गणात गेल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नागरिकांना 21 जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. 28 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्तांना प्रस्ताव सादर करता येणार आहेत. 11 ऑगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निर्णय घेतला जाणार असून 18 ऑगस्टपर्यंत अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांकडे सादर केली जाणार आहे.


