राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांचे भाचे आहेत. तसेच नगरमधील ते मोठे नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून तनपुरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होते. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
प्राजक्त तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे फेसबुक प्रोफाईल बदलले असून डीपीमध्ये जयंत पाटलांचा फोटो लावला आहे. त्यामुळे एक प्रकारचा हा भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत माघार घेणाऱ्या तनपुरे यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांचे समर्थकही यासाठी इच्छुक आहेत.
राहुरी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंनी केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरू झाली होती. माझ्यासोबत पक्षात असणारे तिघेजण राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले , तिकडे त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. मात्र, दुसरीकडे आमच्यासारखे निष्ठा ठेवणाऱ्या राजकारण्यांचे राजकारण संपत चालले आहे याचे दुःख होते, अशी भावना प्राजक्त तनपुरे यांनी बोलून दाखवली होती.


