अहिल्यानगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या वादग्रस्त विधानावरून अजितदादा चांगलेच भडकले आहेत. वारंवार समज देऊन ही काही सुधारणा होत नसल्याचे दादांनी स्पष्ट करत दादा त्यांची कानउघडणी करण्याची शक्यता आहे. जगताप यांच्यामुळे पक्षाच्या सर्वसामावेशक भूमिकेला तडा जात असल्याने यावेळी दादांनी मोठा निर्णय घेतला आहे.राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी दिपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांनी केवळ हिंदू लोकांच्याच दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे वाद ओढावला होता. त्यावर आज सकाळी माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“खरंतर अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते. तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं. परंतु आता काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यावेळेस आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा ही त्याला समजावून सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, मी त्यात सुधारणा करेल. पण ते सुधारणा करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याची जी भूमिका आहे. त्याचे जे विचार आहेत. ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.” अशी स्पष्ट भूमिका अजितदादांनी जाहीर केली. त्यामुळे संग्राम जगताप यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात येणार आणि त्यांना त्यावर त्यांची बाजू मांडावी लागेल असे समोर येत आहे.
अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य नाही. त्यांना याबद्दल सांगूनही सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे पक्षाकडून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहे.”
– अजित पवार, उपमुख्यमंत्री.


