उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात धक्कदायक घटना घडली आहे. एका विहिरीत महिलेचा छिन्नविछिन्न मृतदेह आढळला आहे. धक्कदायक म्हणजे गावच्या सरपंच्याने या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असून तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिलेचे नाव रचना यादव आहे. ती मध्य प्रदेशातील टिकमगढ येथील रहिवासी असून रचना विधवा होती. रचना यादवचा संबंध गावचा माजी सरपंच संजय पटेल यांच्याशी असल्याचे पोलिस तपासात उघड झाले. दोघांमध्ये काही काळापासून घनिष्ठ संबंध होते. मात्र, रचना सतत लग्नाचा आग्रह धरत असल्याने संजय पटेल वैतागले होते. तिच्या या दबावातून मुक्त होण्यासाठी त्यांनी तिची हत्या करण्याचा कट रचला.
रचनाला कसे मारण्यात आले ?
ही भीषण घटना ८ ऑगस्ट रोजी घडली. संजय पटेल व त्याचा पुतण्या संदीप पटेल यांनी रचनाचा गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे करून ते पोत्यात भरले आणि पुरावे लपवण्यासाठी विहिरीत व पुलाजवळ फेकून दिले. या अमानुष कृत्याने परिसरातील लोकांना धक्का बसला.
दरम्यान स्थानिक शेतकऱ्याला काम करत असताना १३ ऑगस्ट रोजी शेतातील विहिरीतून दुर्गंधी आल्याचे जाणवले. तपासणी केली असता पाण्यात दोन पोती तरंगताना दिसली. ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोत्यांमध्ये मानवी अवयव आढळल्यानंतर संपूर्ण घटनेचा पर्दाफाश झाला. त्यानंतर झाशी पोलिसांनी आठ विशेष तपास पथके स्थापन करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
त्यानंतर १७ ऑगस्ट रोजी पोलिसांनी विहिरीतून पीडितेचे हात शोधून काढले. मात्र, तिचे डोके आणि पाय अद्याप सापडले नव्हते. अखेरीस पोलीस पथकाला शोधमोहिमेत यश येऊन लाखेरी नदीत शोध घेतल्यानंतर अखेर महिलेचे डोकेही सापडले. शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी तिचा अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी तपासादरम्यान १०० हून अधिक ग्रामस्थांची चौकशी केली आणि २०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी हजारो पोस्टर्स वाटण्यात आले, ज्यामुळे अखेर मृतदेहाची ओळख पटली. रचनाच्या भावाने हे पोस्टर पाहिल्यानंतर त्याने आपल्या बहिणीची ओळख पटवली.
आरोपीला शोधून देण्यासाठी बक्षीस जाहीर
दरम्यान, पोलिसांनी फरार आरोपी प्रदीप अहिरवारला पकडून देणाऱ्यास २५,००० रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. तर तपास पथकाच्या धाडसी कामगिरीबद्दल ५०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. या तपासात असेही उघड झाले की, रचना यादव एका कायदेशीर वादात अडकली होती, ज्यात संजय पटेलने तिला मदत केली होती. त्यातूनच दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. मात्र, या नात्याचा शेवट अत्यंत भयंकर पद्धतीने झाला.


