अनाया बांगरने क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, मार्च 2027 पासून एलीट महिला क्रिकेट खेळण्यासाठी आपण पात्र असल्याचा दावा अनायाने केला आहे. त्यामुळे भविष्यात तिच्यासाठी महिला बिग बॅश लीग मध्ये खेळण्याची संधीही निर्माण होऊ शकते. मुंबईत वयोगटातील क्रिकेट खेळलेल्या अनायाने ट्रान्सजेंडरनंतर काही काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळण्याची शक्यता तिच्यासाठी भावनिक आणि महत्त्वाची असल्याचे तिने सांगितले.
अनायाने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. “मी क्रिकेट खेळू शकते हे समजल्यानंतरचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा आहे. एक वेळ अशी आली होती, जेव्हा मला वाटले होते की आता मी पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही. मला आणखी एक संधी दिल्याबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मनापासून आभार,” असे तिने म्हटले.अनायाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘एलीट क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या समावेशाच्या धोरणा’ अंतर्गत पात्रता मिळाल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे तिच्यासमोर ऑस्ट्रेलियातील महिला क्रिकेटमध्ये खेळण्याचा मार्ग खुला झाला आहे. मात्र, पात्रता मिळणे म्हणजे WBBL फ्रँचायझीकडून करार मिळण्याची हमी नाही, हे अनायानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिच्यासमोर आता स्वतःला पुन्हा एकदा स्पर्धात्मक क्रिकेटसाठी तयार करण्याचे मोठे आव्हान असेल.
अनाया बांगरचा जन्म 26 डिसेंबर 2000 रोजी मुंबईमध्ये झाला. ती माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचं अपत्य आहे. तिचं आधीचं नाव आर्यन बांगर होतं. बालपणापासून ती एका वेगळ्या ओळखीचा शोध घेत होती, स्वतःची खरी ओळख म्हणून तिला स्त्री म्हणून जगायचं होतं.
अनाया यांचं शिक्षण मुंबईच्या डॉन बॉस्को शाळेत झालं आणि नंतर तिनं रिझवी कॉलेजमधून वाणिज्य शाखेचं शिक्षण घेतलं. क्रिकेटमध्ये गाढ रुची असलेली अनाया बालवयापासूनच क्रिकेट खेळत होती. इस्लाम जिमखाना येथे प्रशिक्षण घेणाऱ्या अनायाने यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, मुशीर खान यांच्यासोबत मैदान गाजवलं होतं. तिच्या क्रिकेट कौशल्यामुळे विराट कोहली यांच्यासारख्या खेळाडूंकडूनही तिला मार्गदर्शन मिळालं.


