अहिल्यानगर -जिल्ह्याचे प्रशासन केंद्र असलेल्या अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाला पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या अधिकृत मेलवर हा धमकीचा संदेश धडकला.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली असून, ‘बॉम्ब शोधक व नाशक’ पथकाकडून (BDDS) परिसराची कसून तपासणी सुरू आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. या वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.
भररस्त्यात ट्रक अडवून 10 लाखांच्या गव्हाची लूट
मध्यप्रदेशातून सोलापूरच्या दिशेने गहू घेऊन जाणार्या एका ट्रकला अहिल्यानगरजवळील देहरे टोल नाक्यावर अडवून चार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत लूट केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी ट्रक चालकाचे हातपाय बांधून ट्रकमधील नऊ लाख 67 हजार 200 रूपये किमतीचे गव्हाचे 953 कट्टे दुसर्या ट्रकमध्ये भरून लंपास केले आहेत.
याप्रकरणी जगदीश चतुर्भुज माळी (वय 55, रा. लहुजा, ता. सितामऊ, जि. मंदसौर, मध्यप्रदेश) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (28 जानेवारी) सायंकाळी फिर्याद दिली आहे. त्यावरून चार अनोळखीविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदीश माळी यांनी त्यांच्या ट्रकमध्ये निमज (मध्यप्रदेश) येथून गव्हाचे कट्टे भरले. ते सोलापूर येथे खाली करण्यासाठी निघाले होते. मंगळवारी (27 जानेवारी) रात्री 8:30 वाजेच्या सुमारास अहिल्यानगर- मनमाड रस्त्यावरील देहरे टोल नाक्याजवळ चार चोरट्यांनी त्यांचा 12 टायर ट्रक माळी यांच्या ट्रकसमोर आडवा लावला. त्यानंतर चोरट्यांनी माळी यांना चाकूचा धाक दाखवून धमकावले आणि त्यांचे हातपाय बांधून टाकले. चोरट्यांनी माळी यांच्या ट्रकमधील सात लाख 99 हजार 200 रूपये किमतीचे 833 गव्हाचे कट्टे आणि एक लाख 68 हजार रूपये किमतीचे 120 गव्हाचे कट्टे असा एकूण नऊ लाख 67 हजार 200 रूपयांचा गहू स्वतःच्या ट्रकमध्ये भरून पोबारा केला.माळी यांनी या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता चोरटे पसार झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून गुन्हा नोंद केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोढे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. भररस्त्यात झालेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


