गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोरणारी बीडची टोळी जेरबंद; ६.७५ लाखांचे गंठण जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र चोरणाऱ्या बीडच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी अयोध्या दिगंबर कोरडे (वय ६२, रा. शिक्षक कॉलनी, कर्जत) या जामखेड येथे जाण्यासाठी कर्जत बस स्थानकातून एसटीमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी श्यामसुंदर जाधव, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, मनोज साखरे, योगेश कर्डीले, महादेव भांड, फुरकान शेख, प्रशांत राठोड व ज्योती शिंदे यांचे पथक तयार करून तपासासाठी रवाना केले.
तपास पथक गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना ३ सप्टेंबर २०२६ रोजी माहिती मिळाली की, हा गुन्हा परशुराम मल्हारी गायकवाड (रा. बीड) याने महिला साथीदारासह केला असून ते मिरजगाव बस स्थानक, ता. कर्जत येथे आले आहेत. माहितीवरून पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
१) परशुराम मल्हारी गायकवाड (वय ४५, रा. सुभाष कॉलनी पेठ, बीड)
२) लक्ष्मी संजय लोखंडे (वय ५९, रा. मोहटादेवी मंदिराच्या पाठीमागे, वडवणी, जि. बीड)
३) पूजा विशाल मोहिते (वय २७, रा. नाळवंडी नाका, शास्त्रीनगर, बीड)
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा ४) कौसाबाई सर्जेराव गायकवाड (रा. गांधीनगर, बीड – फरार) हिच्यासह केल्याची कबुली दिली.
आरोपी परशुराम गायकवाड याने काही दागिने नातेवाईकाकडे ठेवल्याचे सांगितले. पथकाने पंचासमक्ष त्याच्या नातेवाईकाने हजर केलेले ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जप्त केले. उर्वरित मुद्देमाल फरार आरोपी कौसाबाई गायकवाड हिच्याकडे असल्याचे त्याने सांगितले.
ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह कर्जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास कर्जत पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


