अहिल्यानगर -नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे तसेच सर्व सदस्यांसंदर्भात अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांच्या विरोधात 17 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ सविवालयाचे सचिव शिवदर्शन साठे यांच्या लेखी पत्रावरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथे नगरपरिषद निवडणूकीच्या प्रचारादरम्यान 23 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहीत पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेदरम्यान पक्षाचे पदाधिकारी सूर्यकांत मोरे यांनी विधानपरिषदेचे एकूण कामकाज, तेथील रचना, सदस्य यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केले होते. तसेच सभापतींबाबतदेखील आक्षेपार्ह वक्तव्य करत ते कायदेपंडित आहेत का असा सवाल केला होता.
विधानपरिषदेतील कार्पेटचा लाल रंग हा दुष्काळाचे प्रतिक आहे व आमदारांच्या लाल बिल्ल्याला कुणी विचारत नाही असेदेखील मोरे यांनी म्हटले होते. याबाबत आ. दरेकर व आ. भारतीय यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. त्यावर कठोर कारवाई व्हावी. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. आता याप्रकरणी जामखेड पोलिसांनी सूर्यकांत मोरेंविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


