दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी रेखा गुप्ता आज त्यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये जनसुनावणी घेत होत्या, तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. यानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. मात्र, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी साप्ताहिक जनसुनावणीदरम्यान मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स परिसरात जनता दरबार सुरु असताना ही घटना घडली. रेखा गुप्ता जनता दरबारात होत्या. त्यावेळी संबंधित व्यक्तीने एक निवेदन मुख्यमंत्र्यांकडे दिले. मात्र, हा व्यक्ती अचानक आक्रमक झाला त्याने रेखा गुप्ता यांना शिवीगाळ करत त्यांच्या कानाखाली मारली. या व्यक्तीने अनेकदा रेखा गुप्ता यांच्या कानाखाली मारल्या. त्यांचे केस पकडून त्यांना मारहाण केल्याची माहिती आहे. पोलिसांकडून या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली जात आहे. हा व्यक्ती नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, संबंधित व्यक्ती नैराश्यात गेलेल्या एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सूचक वक्तव्य दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर यांनी केले. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे, त्यानंतर त्यांना किती जखमा झाल्या आहेत हे स्पष्ट होईल. हल्लेखोर न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देत होता असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करत आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे वय 35 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली भाजपने या घटनेचा निषेध केला आहे. भाजप नेते रमेश बिधुरी म्हणाले की, रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न सार्वजनिक सुनावणीला अडथळा आणण्याच्या उद्देशाने करण्यात आला आहे असे मला वाटते.