‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेवर आले. भ्रष्टाचाराविरोधातील पंतप्रधान मोदींची आक्रमक भूमिका पाहून लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले खरे, पण पंतप्रधान मोदींच्या पक्षातील नेतेच लाचखोरीच्या प्रकरणात अडकत असल्याचे प्रकार समोर आलाय. कर्नाटकातील गडग जिल्ह्यातील लोकायुक्त पोलिसांनी शिरहट्टी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदाराला ५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलंय. चंद्रू लमाणी, असं या लाचखोर आमदाराचे नाव आहे.
लोकायुक्तांच्या म्हणण्यानुसार,आमदाराला कंत्राटदाराकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं. या कारवाईनंतर आमदाराची अधिक चौकशी केली जात असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले की, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७(अ) आणि ७(अ) अंतर्गत नोंदवलेल्या गुन्हा क्रमांक ०२/२०२६ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक माहितीनुसार, आमदार चंद्रू लमाणी यांनी रस्त्याच्या बाजुला रिटेनिंग भिंती बांधण्याचे कंत्राट देणयासाठी कंत्राटदाराकडून एकूण ११ लाख रुपयांची लाच मागितली. कंत्राटदाराने तक्रार केल्यानंतर लोकायुक्त पथकाने सापळा रचून आमदाराला अटक करण्यात आली. मागितलेल्या ११ लाख रुपयांच्या रकमेतून ५ लाख रुपयांची आगाऊ रक्कम स्वीकारताना आमदाराला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान घटनास्थळावरून पुरावेही गोळा करण्यात आले आहेत.
याप्रकरणी आमदाराचे दोन सहकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. मंजूनाथ वाल्मिकी आणि गुरुनायक,अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. मंजुनाथ वाल्मिकी हे आमदारांचा वैयक्तिक सहाय्यक (पीए) आहे, तर गुरुनायकही वैयक्तिक सहाय्यक असल्याचे सांगितले जाते. लोकायुक्त पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे आणि प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास केला जात आहे.
लोकायुक्त पथकाने सापळा रचला
लोकायुक्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गडग लोकायुक्त पोलrस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक परमेश कवतगी यांनी केले. तर संपूर्ण कारवाईचे पर्यवेक्षण गडग डीएसपी आणि धारवाड पोलीस अधीक्षकांनी केले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सापळा मोहीम पूर्वनियोजित योजनेनुसार पार पाडण्यात आली.


