भाजप आमदार नारायण कुचे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड शिवारात ही घटना घडली आहे. या कारमध्ये आमदार नारायण कुचे नव्हते. तर त्यांचे चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी होता. अपघाताच्या या घटनेने महामार्गावर एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आमदार नारायण कुचे आणि त्यांचे सहकारी छत्रपती संभानीनगरवरून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त विठुरायांच्या दर्शनाला जात असताना ही घटना घडली. धोकादायक वळणावर कार नियंत्रित न झाल्यामुळे उलटल्याची माहिती हाती आली आहे. या घटनेत कारचं मोठं नुकसान झालं आहे. परंतु कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
आषाढी वारी सोहळा सुरू आहे. राज्यभरातील नेते मंडळी पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी जात आहेत. आमदार कुचे देखील पंढरपूरला विठुरायांच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यात अनेक गाड्या होत्या. ताफ्यात पंढरपूरला जाताना आमदार कुचे त्यांच्या कारमध्ये बसले नव्हते. त्यांच्या कारमध्ये चालक, सुरक्षा रक्षक आणि एक सहकारी बसला होता. ते कारमध्ये नसल्याने अपघातामधून बचावले. या अपघतात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या घटनेविषयी आमदार नारायण कुचे यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने कारमधील तिघांना सुरक्षित ठिकाणी नेले. तसेच रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी देखील सुरळीत केली.


