नगर शहरातील घरफोडी व महिलांच्या छेडछाडी प्रकरण ; गुन्हेगारांना कडक संदेश देण्याची गरज – सचिन जगताप

सावेडीतील घरफोडी व महिलांच्या छेडछाडीप्रकरणी आरोपीला अटक; गुणे आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्याकडून पोलिसांचे अभिनंदन

महिलांच्या सुरक्षिततेशी तडजोड सहन केली जाणार नाही; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

तोफखाना पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक, गुन्हेगारांना कडक संदेश देण्याची गरज – सचिन जगताप

अहिल्यानगर : सावेडी उपनगरामध्ये घरफोडी आणि महिलांच्या छेडछाडीच्या गंभीर प्रकरणातील आरोपी विजय सुनील यलन याला तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केल्याबद्दल गुणे आयुर्वेद शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप यांनी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांची भेट घेऊन त्यांचे व संपूर्ण पोलीस पथकाचे अभिनंदन केले. तसेच या प्रकरणातील आरोपीवर कठोर आणि कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, अभिजीत खोसे, सुशील बजाज आदी उपस्थित होते.
सावेडी परिसरात घडलेल्या घरफोडी आणि महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः महिला आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी बोलताना सचिन जगताप म्हणाले की, महिलांच्या सुरक्षिततेला आणि नागरिकांच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे. सावेडी परिसरात घडलेली घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असून अशा प्रकारचे गुन्हे समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात.
ते पुढे म्हणाले की, तोफखाना पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत तत्परतेने तपास करून आरोपीला अटक केली आहे. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. मात्र अशा आरोपींवर केवळ अटक करून थांबता कामा नये, तर त्यांच्यावर अशी कठोर कारवाई झाली पाहिजे की पुन्हा कोणत्याही गुन्हेगाराला अशा प्रकारचा गुन्हा करण्याचे धाडस होणार नाही.
महिलांच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला आव्हान देणाऱ्या प्रवृत्तींना कायद्याचा कठोर धाक बसणे आवश्यक आहे. पोलिसांनी दाखविलेली तत्परता समाजासाठी आश्वासक असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करणारी आहे, असेही ते म्हणाले.
सावेडी परिसरातील नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले. गुन्हेगारांविरोधात तातडीने आणि कठोर पावले उचलल्यास कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles