Wednesday, October 29, 2025

Ahilyanagar News : शेतकर्‍याची 50 लाखांची फसवणूक; चौघांविरूध्द गुन्हा दाखल

पारनेर तालुक्यातील एका शेतकर्‍याची जमीन खरेदीच्या व्यवहारात तब्बल 50 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार सोमवारी (6 ऑक्टोबर) रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन अमीर राजे (वय 63, रा. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.नजिर साहेबलाल शेख, नसिर साहेबलाल शेख, आबिदा आब्बास सय्यद व एकनाथ दगडु भगत (सर्व रा. शेंडी, ता. अहिल्यानगर) या चौघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसन राजे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेंडी येथील गट नं. 383, क्षेत्र 9 हेक्टर 76 आर पैकी 2 हेक्टर 40 आर इतक्या क्षेत्राची जमीन विक्रीस काढण्यात आली होती. सदर जमीन ही नजिर शेख, नसिर शेख आणि आबिदा सय्यद यांच्या मालकीची होती. या जमिनीबाबत बोलणी झाल्यानंतर एकरी 36 लाख 99 हजार या दराने व्यवहार निश्चित झाला. मात्र त्या वेळी जमीन न्यायालयीन वादात असल्याने 22 नोव्हेंबर 2016 रोजी साठेखताचा दस्त करण्यात आला.

या साठेखतानुसार, न्यायालयातील दावा सहा महिन्यांत निकाली काढून त्यानंतर खरेदीखत नोंदविण्याचे ठरले होते. त्या दिवशी वकील अ‍ॅड. आर. पी. शेलोत यांच्या कार्यालयात हा दस्त तयार करण्यात आला. त्यावेळी फिर्यादी हसन राजे यांनी 50 लाख इतकी रक्कम संशयित आरोपींना दिली. त्यापैकी 26 लाख रोख आणि 24 लाख चेकच्या स्वरूपात होती. नंतर संशयित आरोपींनी चेक नकोत, रोख हवे असे सांगितल्याने फिर्यादींनी पुन्हा 24 लाख रूपये रोख स्वरूपात अदा केले.

चेकच्या मागील बाजूस रक्कम मिळाल्याचे संशयित आरोपींच्या स्वहस्ताक्षरी नोंदी करण्यात आल्या. त्यानंतर संशयित आरोपींनी ठरल्याप्रमाणे न्यायालयीन दावा सहा महिन्यांत निकाली न काढता वारंवार टाळाटाळ केली. अखेरीस 27 नोव्हेंबर 2022 रोजी फिर्यादी हसन राजे शेंडी गावात गेले असता संबंधित जमीन एकनाथ दगडु भगत या व्यक्तीने विकत घेतल्याचे समजले. सातबारा उतारा तपासल्यावर आणि वकिलांमार्फत माहिती घेतल्यावर संशयित आरोपींनी उच्च न्यायालयात सेकंड अपील दाखल केल्याचेही उघड झाले.

फिर्यादी हसन राजे यांनी संशयित आरोपींकडे भेट घेऊन दिलेली 50 लाख रूपयांची रक्कम परत मागितल्यावर त्यांनी फसवणुकीने पैसे घेतल्याचे नाकारले तसेच आमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुला संपवू अशी जीव घेण्याची धमकी दिल्याचे हसन राजे यांनी आपल्या फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, एकनाथ भगत याला हा व्यवहार आधीपासून माहित असूनही त्याने जाणीवपूर्वक ती जमीन खरेदी केली, ज्यामुळे संगनमताने फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. या घटनेविषयी न्यायालयात फौजदारी चौकशी अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार आता चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles